मोदींकडून काल टीका झाली, आज ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी पवारांसोबत शेतीवर चर्चा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 03:22 PM2023-10-27T15:22:47+5:302023-10-27T15:44:01+5:30

मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्त्युतर देण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडिओ शेअर करत मोदींना त्यांच्या जुन्या भाषणाची आठवण करुन दिली

Narendra Modi criticized yesterday, today Australian High Commissioner discussed agriculture with Sharad Pawar | मोदींकडून काल टीका झाली, आज ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी पवारांसोबत शेतीवर चर्चा केली

मोदींकडून काल टीका झाली, आज ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी पवारांसोबत शेतीवर चर्चा केली

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डी दौऱ्यात ७५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी, उपस्थित कार्यक्रमात संबोधित करताना मोदींनी शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी, देशाचे कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. शरद पवारांच्या कृषी क्षेत्रातील योगदानावर बोलताना, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा सवाल मोदींनी विचारला. विशेष म्हणजे मोदींच्या टीकेनंतर दुसऱ्याच दिवशी भारतातील ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी शरद पवारांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. 

मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्त्युतर देण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडिओ शेअर करत मोदींना त्यांच्या जुन्या भाषणाची आठवण करुन दिली. तर, जितेंद्र आव्हाड यांनीही दिल्लीच्या सीमारेषेवर पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला १ वर्षे कुणामुळे लागले, असा सवाल उपस्थित केला होता. त्यातच, शरद पवार यांनी ट्विटरवरुन काही फोटो शेअर केले आहेत. तसेच, त्यांनी माहितीही दिली. त्यानुसार, ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत शेतीसह विविध विषयांवर चर्चा केली. शरद पवार यांनी माहिती देताना सर्वप्रथम शेतीचा उल्लेख केला आहे. 

माझ्या निवासस्थानी ‘सिल्व्हर ओक’ येथे भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांचे स्वागत करताना आनंद झाला. आमच्या अर्ध्या तासाच्या बैठकीत कृषी, शिक्षण, पर्यटन, विमान वाहतूक, क्रीडा, व्यापार आणि वाणिज्य या क्षेत्रांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. ग्रीन यांनी प्रत्येक क्षेत्रात भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध दृढ आणि मजबूत करण्यावर भर दिला. ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या लोकांच्या योगदानाची त्यांनी माहिती देत ऑस्ट्रेलियन समाजातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल लाखो भारतीय वंशाच्या नागरिकांचे कौतुकही केले, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. तसेच, देशाच्या राजकारणातील माझ्या ६० वर्षांच्या योगदानालवर भाष्याकेल्याबद्दल ग्रीन यांचे शरद पवार यांनी आभारही मानले. 

ग्रीन यांनी ऑस्ट्रेलियातील साखर उद्योग आणि ऊस शेतीमधील आव्हानांबद्दलही सांगितले. त्यांनी फळांची निर्यात आणि तंत्रज्ञान-इनोव्हेशन एक्स्चेंजसाठी नवीन संधींची माहिती दिली. दोन्ही देशांमधील विमानांची संख्या वाढवण्याबाबत शरद पवार यांनी त्यांच्या मताशी सहमती दर्शवली. त्यामुळे, पर्यटनाला चालना मिळेल, शिवाय विद्यार्थी आणि कामगारांना अधिक संधी शोधण्यास मदत होईल, असेही पवार यांनी म्हटले. दरम्यान, ग्रीन यांना सोबत घेऊन या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल सुश्री माजेल हिंद, मुंबईतील ऑस्ट्रेलियन कॉन्सुल जनरल यांचेही पवारांनी आभार मानले.

Web Title: Narendra Modi criticized yesterday, today Australian High Commissioner discussed agriculture with Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.