'चीनच्या घुसखोरीसंदर्भात नरेंद्र मोदी खोटं बोलून देशवासियांची फसवणूक करतायंत'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 10:56 AM2020-06-21T10:56:45+5:302020-06-21T10:58:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी किंवा भारताची कोणतीही चौकी त्यांच्या ताब्यात गेलेली नाही, असे सांगत उपस्थितांना आश्वस्त केले होते
नवी दिल्ली - लडाखच्या सीमारेषेवरील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्य सैन्यात झालेल्या झटापटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच, चीन सैन्य भारतीय हद्दीत घुसलेच नव्हते, तर मारहाण होऊन जवान शहीद झालेच कसे ? असा प्रश्नही आंबेडकर यांनी विचारला आहे. यावरुन पंतप्रधान मोदी नागरिकांची फसवणूक करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी किंवा भारताची कोणतीही चौकी त्यांच्या ताब्यात गेलेली नाही, असे सांगत उपस्थितांना आश्वस्त केले होते. तसेच भारताची एक इंच जमीनही कोणीही बळकावू शकणार नाही. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर समर्थ असल्याचे मोदींनी सांगितले होते. मोदींच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी मोदींवर टीका केली. काँग्रेससह इतरही पक्षाच्या नेत्यांनी मोदींना लक्ष्य केले होते. विरोधकांनी केलेली टीका म्हणजे वाह्यात असल्याचे उत्तर शनिवारी पंतप्रधान कार्यालयाने दिले. पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, आमच्या हद्दीत चीनची घुसखोरी नाही, हे पंतप्रधानांचे वक्तव्य आमच्या सशस्त्र दलाच्या साहसानंतर उत्पन्न स्थितीशी संबंधित होते. भारतीय सैन्य निर्णायक स्वरूपात एलएसीवर मुकाबला करीत आहे.
मोदींच्या वक्तव्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींना लक्ष्य केले. लडाख सीमारेषेवरील घुसकोरीसंदर्भात मोदींनी जनतेशी फसवणूक करत खोटे बोलल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी गलवान खोऱ्याचा प्रदेश चीनच्या ताब्यात जाऊन दिला. जर हा भूभाग चीनचाच होता तर मग आपले सैनिक कसे मारले गेले? आपले सैनिक नक्की कोणत्या जागी शहीद झाले, असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.