मुंबई : दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जवळच्याच एका गुहेत जाऊन ध्यानही केले. यावरुन विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही नरेंद्र मोदींच्या केदारनाथ दर्शनाला 'नौटंकी' असल्याचे म्हणत निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काल मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. सरकारमध्ये बसले आहेत त्यांनी लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे अपेक्षित आहे. मात्र सरकार चालवणारे आज राजधानी सोडून हिमालयात जावून बसले आहेत, असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदींना लगावला. तसेच, सध्या राजकारणात नौटंकी सुरु आहे. काल संध्याकाळपासून वृत्तवाहिन्यांवरही नौटंकीच चालू होती. मोदींचे केदारनाथला जाणे ही देखील नौटंकी आहे, असेही शरद पवार म्हणाले.
याचबरोबर, काही वृत्तवाहिन्या सत्ताधारी पक्षाच्या हातातील 'कठपुतली बाहुल्या' बनल्या आहेत. अनेक लोकांनी फोन करून माझ्याकडे याबाबत चिंता व्यक्त केली. मात्र चिंता करण्याचे कारण नाही. येत्या काही दिवसांतच चित्र स्पष्ट होणार आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी एक्झिट पोलवर दिली.