Join us

नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्गात; शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, नौदल दिन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 8:00 AM

इतिहासात पहिल्यांदाच सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन साजरा केला जात आहे

मुंबई/सिंधुदुर्ग - देशातील ४ राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला दैदिप्यमान यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयी सभेला संबोधित करताना हा विकास आणि विश्वासाचा विजय असल्याचं म्हटलं. त्यानंतर, आज म्हणजेच निकालाच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज नौदल दिन साजरा केला जात आहे. त्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यात सिंधुसागरावर नौदल आपली ताकद दाखवणार आहे. तर, नौदलाने उभारलेेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकोट समुद्रकिनारी अनावरण होणार आहे.

इतिहासात पहिल्यांदाच सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन साजरा केला जात आहे. यापूर्वी नौदल दिन मुंबईत साजरा केला जात. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास असलेल्या सागरी दुर्गावर यंदाचा नौदल दिन साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि रणनिती अभ्यास नौदलासाठी प्रेरक ठरेल. तसेच, या सोहळ्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचा प्रयत्नही नौदलाकडून होत आहे. त्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. तारकर्ली एमटीडीसीजवळ प्रमुख कार्यक्रम होणार असून नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार हे पंतप्रधानांचं स्वागत करतील. यावेळी, नौदलाकडून आपली प्रात्यक्षिके दाखवत देशाचं सागरी सामर्थ्य जगाला दिसणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालवलेल्या तेजस या फायटर जेटचाही यात समावेश असेल. 

मोदींच्या ताफ्याची रंगीत तालीम

सिंधुदुर्ग किल्ल्याकडे पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर शनिवारी प्रशासनाच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात आली. सागरी महामार्ग, कोळंब पूल, बोर्डिंग मैदान, फोवकांडा पिंपळ, राजकोट, भरड, एसटीस्टॅण्ड, वायरी, तारकर्ली या मार्गावर दुपारी चार ते सहा या वेळात पोलिसांनी गाड्यांचा ताफा नेऊन रंगीत तालीम घेतली. यावेळी रस्त्याच्या बाजूने नागरिकांनी उभे राहून पोलिसांच्या रंगीत तालीमचा आनंद घेतला.

दरम्यान, आज ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरात आणि तारकर्ली मार्गावर सुरक्षा यंत्रणांकडून वाहनांचा ताफा फिरवून तपासणी करण्यात आली. या ताफ्यामध्ये सर्व सुरक्षा यंत्राणांचे अधिकारी तसेच इतरही पथके सहभागी झाली होती.

३५ फूट उंची पुतळा

यंदाचा भारतीय नौसेना दिन आज ४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्गवर साजरा होत आहे. या कार्यक्रमापूर्वी किल्ल्यात सुमारे ३५ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा संकल्प नौसेनेने केला होता. मात्र, आता तो पुतळा राजकोटला उभारला जाईल.

टॅग्स :सिंधुदुर्गनरेंद्र मोदीमुंबईछत्रपती शिवाजी महाराज