मुंबई - गुजरात निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली आहे. गुजरातचा प्रचार हा विकासाच्या मुद्यावर होणे गरजेचे होते, पण पंतप्रधानांच्या भाषणांतून विकासाचा मुद्दा गायब झाला व पंतप्रधानही प्रचार सभांतून स्वतःच्याच राज्यात हमरीतुमरीवर आले असे लेखात म्हटले आहे. ज्या राज्यात भाजपने २२ वर्षे राज्य केले व ज्या राज्याने देशाला ‘ताजा’ पंतप्रधान दिलाय त्या राज्यात इतका खालच्या पातळीवर प्रचार करण्याची वेळ भाजपवर का यावी? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.
मोदी गुजराती अस्मितेच्या शृंखलेतच अडकून पडले आहेत. गुजरात निवडणुकीत मोदी हे राष्ट्रीय कमी व क्षेत्रीय जास्त झाले, पण इतरांनी त्यांच्या प्रांतीय अस्मितांच्या तलवारी उपसल्या की, मग मात्र ‘राष्ट्रीय बाणा’ वगैरे दाखवून समोरच्याला गप्प केले जाते असे लेखात म्हटले आहे. निवडणूक आयोगावरही उद्धव यांनी टीका केली आहे. परंपरेप्रमाणे गुजरातमध्येही ‘ईव्हीएम’ घोटाळे उघड झाले असून आता भाजपपुरस्कृत निवडणूक आयोगाकडे ‘ईव्हीएम’ घोटाळय़ाविषयी तक्रार करणे म्हणजे भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखेच आहे असे म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- गुजरातचा प्रचार हा विकासाच्या मुद्यावर होणे गरजेचे होते, पण पंतप्रधानांच्या भाषणांतून विकासाचा मुद्दा गायब झाला व पंतप्रधानही प्रचार सभांतून स्वतःच्याच राज्यात हमरीतुमरीवर आले. पंतप्रधान कधी भावनिक तर कधी भलतीच आक्रमक भाषणे करीत आहेत. ज्या राज्यात भाजपने २२ वर्षे राज्य केले व ज्या राज्याने देशाला ‘ताजा’ पंतप्रधान दिलाय त्या राज्यात इतका खालच्या पातळीवर प्रचार करण्याची वेळ भाजपवर का यावी?
- गुजरात निवडणुकांचा प्रचार अत्यंत खालच्या पातळीवर घसरला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत शनिवारी ६८ टक्के मतदान झाले. परंपरेप्रमाणे गुजरातमध्येही ‘ईव्हीएम’ घोटाळे उघड झाले असून आता भाजपपुरस्कृत निवडणूक आयोगाकडे ‘ईव्हीएम’ घोटाळय़ाविषयी तक्रार करणे म्हणजे भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखेच आहे. प्रचाराची पातळी घसरत गेली ती भारतीय जनता पक्षामुळे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक प्रचारात ‘अफझलखान’, ‘शाईस्तेखान’ यांचा प्रवेश प्रचारात होताच भाजपची डोकी झणझणू लागली व आमच्या नेत्यांना ‘खाना’वळींची उपमा देणे ही प्रचार पातळी सोडल्याचे लक्षण असल्याचे सांगण्यात आले, पण गुजरातच्या प्रचार सभांतून खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच ‘मुगल’ राजवट कबरीतून उकरून काढली. काँग्रेसचे राज्य हे औरंगजेब व मोगलांचे होतेच आणि ते जनतेने याआधीच उखडून फेकून दिले. त्यामुळे गुजरातचा प्रचार हा विकासाच्या मुद्यावर होणे गरजेचे होते, पण पंतप्रधानांच्या भाषणांतून विकासाचा मुद्दा गायब झाला व पंतप्रधानही प्रचार सभांतून स्वतःच्याच राज्यात हमरीतुमरीवर आले.
- पंतप्रधान कधी भावनिक तर कधी भलतीच आक्रमक भाषणे करीत आहेत. ज्या राज्यात भाजपने २२ वर्षे राज्य केले व ज्या राज्याने देशाला ‘ताजा’ पंतप्रधान दिलाय त्या राज्यात इतका खालच्या पातळीवर प्रचार करण्याची वेळ भाजपवर का यावी? काँग्रेसचे बिनकामाचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांच्या बाबतीत ‘नीच’ असा शब्द वापरला. या शब्दामुळे गुजराती अस्मितेचा अपमान झाल्याचे पंतप्रधान म्हणतात. आपल्याबाबत वापरलेल्या अपशब्दामुळे देशाचा अपमान झाला नसून फक्त गुजरातचाच अपमान झाल्याचे सांगून मोदी यांनी स्वतःला छोटे करून घेतले. आम्ही मोदी यांना देशाची व हिंदूंची अस्मिता मानतो, पण ते आजही गुजराती अस्मितेच्या शृंखलेतच अडकून पडले आहेत. गुजरात निवडणुकीत मोदी हे राष्ट्रीय कमी व क्षेत्रीय जास्त झाले, पण इतरांनी त्यांच्या प्रांतीय अस्मितांच्या तलवारी उपसल्या की, मग मात्र ‘राष्ट्रीय बाणा’ वगैरे दाखवून समोरच्याला गप्प केले जाते.
- राहुल गांधी हे कुचकामी आहेत व राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यामुळे भाजपचा विजय सोपा झाला असे सांगितले गेले आणि ते खरे मानले तर पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्ष, सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ व राज्याराज्यांचे मुख्यमंत्री भरलेले पेटारे घेऊन राहुलच्या विरोधात तुताऱ्या का फुंकत आहेत, याचे कोडे देशवासीयांना सुटलेले नाही. सत्य व असत्यावर आता निवडणुका जिंकल्या जात नाहीत आणि विकासाचा मुद्दाही बिनकामाचा हे गुजरातेत भाजपने दाखवून दिले. कारण भाजप जाहीरनामा काढायला विसरून गेला आणि विकासावर कोणी बोललेच नाही. व्यासपीठावर अश्रू ढाळणे, तांडव करणे व भावनिक भाषणे करणे एवढय़ापुरतेच गुजरात निवडणुकीचे महत्त्व उरले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तर पंतप्रधान फारच भावनिक बोलले. सारे देशवासीय म्हणजे माझे कुटुंबीय आहेत असे ते म्हणाले. म्हणजे याआधीचे सर्व पंतप्रधान, राष्ट्रपती, पुढारी हे देशाचे किंवा देशवासीय त्यांचे कुणीच लागत नव्हते काय? इंदिरा गांधी यांच्यासारख्यांनी तर देशासाठी बलिदान केले व अनेक राज्यकर्त्यांनी, नेत्यांनी देशासाठी तुरुंगवास भोगला. सावरकरांनी काळे पाणी व टिळकांनी सहा वर्षांचा सश्रम कारावास भोगला. देशवासीय त्यांचे कुटुंब होते म्हणूनच त्यांनी हा त्याग केला. एवढेच नव्हे तर सीमेवर जे सैनिक बलिदान देत आहेत तेसुद्धा आपल्या कुटुंबाचाच भाग आहेत हे विसरू नका. राज्यकर्त्यांनी भावनांचा बांध फोडतानाही संयम बाळगला तर बरे होईल.