मुंबई - इच्छाशक्ती दाखवल्यामुळे मुंबईतील अनेक प्रकल्प मार्गी लागतायेत. ४५० किमी रस्ते सिमेंट क्रॉकिंटचे होणार आहेत. दोन अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल आणि लोकांचे जीवन सुसज्ज होईल. काही लोक खोडा घालण्याचं काम करतायेत. त्यांना ते काम करू द्या. दरवर्षी पडणारे खड्डे आणि खड्ड्यातून जाणारे बळी रोखण्याचं काम आम्ही करतोय. निष्पाप लोकांचे बळी जाणार नाहीत. डांबरीकरणाच्या नावाखाली काळे-पांढरे करणाऱ्या लोकांची दुकाने यामुळे बंद होणार आहे हे खरे दुख: आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदींचे जिव्हाळ्याचे नाते होते. हिंदुत्व हा विचारांचा धागा होता आणि विकासाचं राजकारण हा पाया होता. मेट्रो, शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक लवकरच उद्धाटन होईल. रस्ते, रेल्वे, सागरी महामार्ग याचा दळणवळण आराखडा महाराष्ट्राच्या मातीतून जगासमोर ठेवतोय. सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आल्यानंतर तात्काळ अनेक रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावले. मेट्रोमुळे ४० लाख वाहने रस्त्यावरून कमी होतील. लोकांचा प्रवास सुखद होईल. शहरात बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत टीकेला उत्तर आम्ही कामाने देऊ. जेवढी टीका कराल त्याच्या १० पटीने काम करू. ६ महिन्यात सरकारने अनेक निर्णय घेतले त्यामुळे काहींच्या पोटात मळमळ होतेय, जळजळ होतेय. छातीत धडकी भरली आहे. ६ महिन्यात इतके काम केले तर पुढील २ वर्षात किती काम होईल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लगावला.
उपमुख्यमंत्र्यांनीही साधला निशाणा २०-२५ वर्ष मुंबई महापालिकेवर ज्यांची सत्ता होती त्यांनी केवळ डिपॉझिट केले. स्वत:ची घरे भरली परंतु मुंबईकरांना स्वच्छ पाणी दिले नाही. टक्केवारीमुळे अनेक कामे केली नाही. ४ वर्षापूर्वी मुंबईच्या रस्त्यांचे परीक्षण केले. त्यावेळी रस्त्याखालची पातळीच गायबच आहे हे आढळले. ४० वर्ष रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत त्यासाठी सिमेंट कॉक्रिंटचे रस्ते बनवण्याचं काम आज त्याचं भूमिपूजन होईल असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य केले.