मुंबई - भाजपा सरकार असो, एनडीए सरकार असो आम्ही कधी विकासापुढे राजकारण आणत नाही. विकास आमच्यासाठी प्राधान्य आहे. आम्ही कधी विकासाला ब्रेक लावला नाही. परंतु आम्ही मुंबईत हे वारंवार पाहत आलोय. शहरातील अर्थव्यवस्थेचे प्रमुख भाग आहेत त्या छोट्या व्यापारांसाठी आम्ही कर्ज उपलब्ध करून दिले. आजही १ लाखाहून अधिक फेरिवाल्यांच्या खात्यात पैसै जमा झाले. हे काम खूप आधीच व्हायला हवे होते. परंतु काही काळ डबल इंजिन सरकार नसल्याने प्रत्येक कामात अडथळे आणले गेले. त्यामुळे लाभार्थ्यांचे नुकसान झाले. दिल्लीपासून मुंबईपर्यंत एकच सत्ता असेल तर विकासात अडथळा येणार नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजवलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला गती मिळतेय. रेल्वे स्टेशनला एअरपोर्टप्रमाणे विकसित करण्यात येत आहे. देशात सर्वात जुन्या रेल्वे स्टेशनपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन विकसित होणार आहे. लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा बनतील. सामान्य प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील. कर्मचाऱ्यांना ये-जा करताना सुलभ होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच केवळ रेल्वे स्टेशन नाही तर वाहतुकीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळतील. मल्टिमॉडेल कनेक्टिव्हीटी देशातील सर्व शहरात विकसित केले जात आहे. येणाऱ्या काही वर्षात मुंबईचा कायापालट होणार आहे. गरीब मजूर, कर्मचारी, दुकानदार, व्यापाऱ्यांसाठी इथे राहणे सुविधाजनक होतील. त्याचसोबत आसपासच्या जिल्ह्यातील लोकांनाही इथे येणे सोप्पे होणार आहे. मुंबईला नवीन ताकद देणारे अनेक प्रकल्प सध्या सुरु आहे. सर्वकाही ट्रॅकवर येतेय. त्यासाठी मी शिंदे-फडणवीसांचे आभार मानतो असंही मोदी म्हणाले.
मुंबईच्या विकासात महापालिकेची भूमिका महत्त्वाचीमुंबईतील रस्ते सुधारण्यासाठी जे काम सुरू होते ते डबल इंजिन सरकारच्या कामाचे प्रतिक दिसतेय. शहरातील प्रत्येक समस्यांचे समाधान करणे यावर काम सुरू आहे. बायोफ्युल आधारित वाहतूक प्रणाली गतीने आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शहरांच्या विकासासाठी सामर्थ्य आणि राजकीय इच्छाशक्तीची कमी नाही. परंतु मुंबईसारख्या शहरात प्रकल्प तोपर्यंत विकसित होऊ शकत नाही जोवर महापालिका वेगाने ते अंमलात आणत नाही. मुंबईच्या विकासात महापालिकेचा भूमिका महत्त्वाची आहे. बजेटची काही कमी नाही. मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी असायला हवा. पैसा बँकेत ठेवला तर विकास साध्य कसा होणार? भ्रष्टाचारी लोकांच्या हाती असेल तर शहराचा विकास कसा होणार? मुंबई विकासापासून वंचित राहील हे २१ व्या शतकातील जनता कधीच स्वीकारणार नाही असं सांगत मोदींनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.