Narendra Modi In Mumbai: "मुंबईकरांनो, डोळ्यात डोळे घालून विश्वासानं सांगतो की...", PM मोदींनी दिलं मोठं वचन!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 07:32 PM2023-01-19T19:32:26+5:302023-01-19T19:32:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत ४० हजार कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजनाचं आणि काही कामांचं लोकार्पण करण्यात आलं.
मुंबई-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत ४० हजार कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजनाचं आणि काही कामांचं लोकार्पण करण्यात आलं. बीकेसी येथे आयोजित जाहीर सभेत यावेळी मोदींनी विकास कामांची माहिती दिली. आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात यावेळी मुंबईतील विकास कामांचा आवर्जुन उल्लेख केला. तसंच मुंबईकरांच्या समस्यांवरही भाष्य केलं आणि फेरीवाल्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केल्या गेलेल्या स्वनिधी योजनेची माहिती मोदींनी दिली.
"पीएम स्वनिधी योजना फक्त लोन देणारी योजना नाहीय. फेरीवाले आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी आर्थिक बळ देणारी स्वाभीमान प्राप्त करुन देणारी योजना आहे. पण मध्यंतरीच्या काळात शिंदे-फडणवीस यांचं डबल इंजिन सरकार नसल्यामुळे योजना रखडली होती. याचा अनेक फेरीवाल्यांना तोटा सहन करावा लागला. असं पुन्हा होऊ नये यासाठी दिल्लीपासून महाराष्ट्र आण मुंबईपर्यंत योग्य ताळमेळ असलेलं सरकार असलं पाहिजे. स्वनिधी योजना स्वाभीमानाची जडीबुटी आहे. स्वनिधी योजनेअंतर्गत डिजिटल व्यवहार फेरीवाले, ठेलेवाल्यांना कळावेत यासाठी मुंबईत सव्वा तीनशे कॅम्प लावण्यात आले होते. यामुळे हजारो फेरीवाल्यांना डिजिटल व्यवहाराचं ज्ञान प्राप्त झालं. आज जवळपास ५० हजार कोटी रुपायांचं डिजिटल ट्रान्झाक्शन ज्यांना आपण अशिक्षित मानतो, कमी लेखतो अशा लोकांनी हा पराक्रम केला आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
मुंबईकरांना दिला विकासाचा विश्वास
"मुंबईच्या विकासासाठी शिंदे-फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. मी माझ्या फेरीवाले, ठेलेवाले आणि छोट्या व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही माझ्यासोबत दहा पावलं चाला. मी तुमच्यासाठी अकरा पावलं चालेन. मी हे यासाठी सांगतोय याआधी फेरीवाले सावरकाराकडे उधारी घ्यायला जायचे त्यांना व्याजात बुडवलं जायचं. या सर्व अडचणीतून बाहेर काढण्यासाठी स्वनिधी योजना आम्ही सुरू केली. मी तुमच्यासोबत उभा आहे हे वचन देण्यासाठी आज मुंबईत आलो आहे. तुमच्या डोळ्यात डोळे घालून उज्ज्वल भविष्याचा विश्वास देण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर आलो आहे. मला विश्वास आहे की छोट्या छोट्या लोकांच्या परिश्रमातूनच देश विकासाची उंची गाठेल. सर्व लाभार्थी, संपूर्ण महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो की ही शिंदे-फडणवीस जोडी महाराष्ट्राची स्वप्न साकार करेल", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
मुंबईच्या हक्काच्या पैशाचा योग्य विनियोग व्हायला हवा
मुंबईच्या विकासासाठी बजेटची अजिबात कमतरता नाही. पण लोकांच्या हक्क्याच्या पैशाचा सुयोग्य विनियोग व्हायला हवा. भ्रष्टाचार होणार असेल तर शहराचा विकास होऊ शकत नाही. मुंबईला भविष्यासाठी तयार करणं ही डबल इंजिन सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठिशी उभं राहून विकासाभिमूख दृष्टीकोन ठेवणं गरजेचं आहे, असं मोदी म्हणाले.