मुंबई - कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसने मुंबईत स्थलांतरित मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे देऊन उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परत जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच त्या राज्यांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मोदींच्या या टीकेनंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्यांनी कोरोना काळातील फोटो शेअर केले आहेत. तर, राष्ट्रवादीनेही मोदींना महाराष्ट्रद्रोही Bjp या हॅशटॅगखाली प्रत्युत्तर दिलंय.
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, दिल्लीच्या सरकारनेही मजुरांना ते शहर सोडायला सांगितले व त्यांच्यासाठी अनेक बसची व्यवस्था केली. याचा परिणाम पंजाब, उत्तराखंडमध्येही कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. कोरोनाचा पसार होण्यास मोदींनी महाराष्ट्राला जबाबदार धरल्याने महाविकास आघाडीचे नेते चांगलेच संतापले आहेत.
मोदींच्या भाषणानंतर ट्विटरवर महाराष्ट्रद्रोही bjp हा हॅशटॅग सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या हॅशटॅगने एनसीपीच्या अकाऊंवरील एक ट्विट रिट्विट केलं आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ''ज्या राज्यात निवडणूक त्याची उचलायची तळी आणि महाराष्ट्राच्या बदनामीचे धोरण एककल्ली. पण, महाराष्ट्राची खोटी बदनामी करून निवडणुका जिंकता येत नाहीत हे लक्षात घ्या आणि संसदेत बोलताना तरी भाजपच्या स्टार प्रचारकाच्या भूमिकेतून बाहेर या'', असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे. जयंत पाटील यांनी हे ट्विट शेअर केले आहे.
दरम्यान, फक्त आणि फक्त पंजाब, युपी, उत्तराखंड येथील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून देशाच्या प्रमुखांनी संसदेत महाराष्ट्राला अवमानजनक आणि चुकीचे विधान करणे शोभत नाही, असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे.