मुंबई - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीबाळासाहेब ठाकरे यांना ट्विटरवरून विनम्र अभिवादन केले आहे. 'माननीय बाळासाहेब ठाकरे हे दृढ निश्चयाचे आणि जनतेच्या भल्याचा विचार करणारे नेते होते. अत्यंत धाडसी आणि कुशाग्र बुद्धीमत्ता असलेले ते उत्तुंग व्यक्तीमत्व होते. अमोघ वाणीने त्यांनी लाखो लोकांना आकर्षित केले होते' असं ट्वीट नरेंद्र मोदींनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विटरवरून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली आहे. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आदित्य ठाकरे बॅट घेऊन बॅटिंग करत आहेत, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचं कौतुक करत उभे असल्याचे दिसत आहे.
शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्येशिवसेना भवनासमोरच शिवसेनाप्रमुखांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. चेतन राऊत या कलाकाराने 33 हजार रुद्राक्षांनी बाळासाहेबांची प्रतिमा साकारत अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन केले आहे. बाळासाहेब ठाकरेंचं रुद्राक्षांसोबत वेगळंच नातं होतं. त्यामुळेच त्यांची प्रतिमा रुद्राक्षांनी साकारल्याची माहिती प्रतिमा साकारणारा कलाकार चेतन राऊतने दिली. तब्बल 33 हजार रुद्राक्षांचा वापर करुन 8 बाय 8 फूट या आकारातील ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. तसेच या माध्यमातून जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्नही केल्याचेही राऊतने सांगितले.