Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी इतिहास रचणार, लाल किल्ल्यावरुन आज भाषण देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 09:02 AM2022-04-21T09:02:18+5:302022-04-21T09:02:51+5:30
लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन नाही, तर किल्ल्यातील लॉन्सवरुन ते देशवासीयांना संबोधित करतील.
मुंबई - गुरू तेजबहादूर यांच्या 400 व्या जयंती निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी एक नवीन इतिहास रचणार आहेत. सुर्यास्तानंतर नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन भाषण देणारे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. ते आज देशाला लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार आहेत. मात्र, लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन नाही, तर किल्ल्यातील लॉन्सवरुन ते देशवासीयांना संबोधित करतील.
सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच किल्ल्यावरुन मुघल शासक औरंगजेबने 1675 मध्ये शीख समुदायाचे नववे गुरू, गुरू तेज बहादूर यांचे शीर कापण्याचे आदेश दिले होते. म्हणूनच, तेज बहादूर यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी लाल किल्ल्याचे ठिकाण नियोजित आहे. लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन देशाचे पंतप्रधान केवळ स्वातंत्र्यदिनीच देशाला संबोधित करत असतात. मात्र, त्यानंतर पुन्हा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करण्यात येत नाही. त्यामुळे, स्वातंत्र्यदिनानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधान या ऐतिहासिक स्थळावरुन भाषण देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आज गुरुवार रात्री 9.30 वाजता भाषण करणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी मोदींनी 2018 मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा 75 वा स्थापना दिवस साजरा केला होता. त्यावेळी, लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. तर, सकाळी 9 वाजता त्यांनी भाषण केले होते. आजच्या कार्यक्रमात 400 शीख संगीतकारांद्वारे आंदराजली वाहण्यात येणार असून लंगरही ठेवण्यात आला आहे. या जयंतीनिमित्ताने मोदींच्याहस्ते एक स्मरणीय नाणे आणि पोस्ट तिकिटाचेही अनावरण करण्यात येणार आहे.