Join us

नरेंद्र मोदी संविधानाचे रक्षक, तेच काँग्रेसला उध्वस्त करतील - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 6:50 PM

जे संविधान उध्वस्त करण्याचा विचार करतील तेच या देशातून उध्वस्त होतील असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिला. 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाचे रक्षक आहेत. नरेंद्र मोदींवर संविधान उध्वस्त करतील असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला तो पूर्णपणे चुकीचा आहे. नरेंद्र मोदी हे संविधानाला नाही तर या देशातून काँग्रेसला उध्वस्त करतील. संविधानाला कोणी उध्वस्त करू शकत नाही जे संविधान उध्वस्त करण्याचा विचार करतील तेच या देशातून उध्वस्त होतील असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिला. 

आसाम येथील सिलचर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना रामदास आठवले बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ते संविधान उध्वस्त करतील अशी टीका विरोधी पक्षांकडून वारंवार केली जाते. या टीकेवर आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी भाष्य करत नरेंद्र मोदी हे संविधान उध्वस्त करणार नाहीत मात्र कॉंग्रेस पक्षाला नक्की उध्वस्त करतील असा टोला विरोधकांना लगावला. 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे जगात सर्व श्रेष्ठ संविधान असून ते कोणीही कधीही बदलू शकत नाही. संविधान कोणीही उध्वस्त करु शकत नाहीत जे संविधान उध्वस्त करण्याचा विचार करतील तेच उध्वस्त होतील असंही रामदास आठवले यांनी सांगितले. संविधान कोणी बदलू शकत नाही हे त्रिवार सत्य असताना काँग्रेस नेते जनतेत गैरसमज पसरविण्यासाठी चुकीचा खोटा आणि खोडसाळ प्रचार करीत आहेत असा आरोप रामदास आठवलेंनी काँग्रेसवर केला. तसेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  संविधानाचे संरक्षक आहेत. त्यांच्यावर प्रियांका गांधी यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. नरेंद्र मोदी हे लोकशाही मार्गाने देशात निवडून आले आहेत. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी हे लोकशाही मार्गाने जनतेच्या मनातून काँग्रेसला उखडून फेकणार असून या देशातून काँग्रेसला उध्वस्त करतील असा दावा आठवले यांनी यावेळी केला.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकनिवडणूकनरेंद्र मोदीसिलचर