मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचा राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा मुंबईत पार पडला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. त्यामध्ये, उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत, युवा नेता आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही भाषण करताना शिंदे गट आणि भाजपला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंनी शिंदेंचा उल्लेख मिंधे करत दिल्लीसमोर हुजरेगिरी करत असल्याचं म्हटलं. तर, मोदी सरकारवर निशाणा साधताना मणीपूरमधील भडकलेल्या हिंसाचारावरही भाष्य केलं. तसेच, देवेंद्र फडणवीस यांची अवस्था केविलवाणी असल्याचं म्हटलं. याच पदाधिकारी मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदी सरकारकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याची टीका केली. पाकिस्तान हा देश तीन A चालवतात, तीन A म्हणजे अल्लाह... अरब आणि अमेरिका असे म्हणत पाकिस्तान देश या देशांवर निर्भर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. तर भारत हा देशही तिघेच चालवतात, असं राऊत म्हणाले. भारतातील हे तिघे म्हणजे ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स असे म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारकडून या एजन्सींचा वापर सत्ता चालवण्यासाठी होत असल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी, राऊत यांनी एक दावाही केला.
२४ तासांत शिवसेनेत प्रवेश
आमची सत्ता येऊ द्या, २४ तासांत मोदी-शहा आणि फडणवीस हे शिवसेनेत प्रवेश करतील, ईडी-सीबीआयच्या भीतीने ते २४ तासांत शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावाच राऊत यांनी केली.
आमचा बाप बाळासाहेब ठाकरेच
शिवसेना एकच आहे, डुप्लिकेट माल खूप असतात. जत्रेतले सूर्य चंद्र आहेत, त्यांच्यासोबत आता लोक फोटो काढतील, असे म्हणत संजय राऊंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. आपला पक्ष हा अब्दूल सत्तारांचं बोगस बियाणं नाहीये, हे बाळासाहेब ठाकरे यांचं अस्सल खरं बियाणे आहे. आमची शिवसेना कोणाला चोरता येणार नाही, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, असे म्हणत पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला.
भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा
दरम्यान, बरेच नेते केंद्रातून मुंबईत येतात. जेपी नड्डा येतायेत, अमित शाह येतात. मुंबई का कब्जा लेंगे म्हणताय ? तुझ्या बापाची आहे का मुंबई? हिंम्मत असेल तर निवडणूक घ्या, असे आव्हानही संजय राऊत यांनी भाजपला दिले.