लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असून, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मुंबईतील लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असून, त्यांचा प्रवास सुखाचा करा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, छत्रपतींच्या गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून द्या यासह महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या मागण्या करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भविष्यात हिंदुस्थान जगभरात अव्वल ठरो, अशा शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या एकत्र उपस्थितीतील सभा शिवाजी पार्क येथील मैदानात पार पडली. पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी राज यांचे भाषण झाले. यावेळी राज यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, असा उल्लेख करीत गौरवोद्गार काढले. काश्मीरमधून ३७० कलम हटविले, अयोध्येत राम मंदिर उभारले, तीन तलाकचा विषय मिटवून मुस्लिम महिलांना दिलासा देणारा कायदा केला, यासारखे धाडसी निर्णय केवळ मोदी पंतप्रधान होते म्हणूनच झाले, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयांचे कौतुक केले.
राज ठाकरे यांच्या मोदींकडे मागण्या
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय अनेक वर्षे खितपत पडला असून, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तत्काळ हा निर्णय घ्या. हिंदुस्थानभर पराक्रम गाजवणाऱ्या मराठ्यांचा इतिहास देशातील विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात शिकवावा. अरबी समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा उभा राहील की नाही माहीत नाही; पण, त्यांचे खरे स्मारक असलेल्या गडकिल्ल्यांना शिवकालीन वैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर समिती नेमावी. ज्यामुळे आमचा राजा कसा होता हे येणाऱ्या पिढ्यांना कळेल. मुंबई-गोवा महामार्ग अजूनही खड्ड्यांनी व्यापला आहे. गेली अनेक वर्षे तो पूर्ण झालेला नाही. तो तत्काळ पूर्ण व्हावा. भारतामध्ये संविधानाला कधीच धक्का लागणार नाही हे ठासून सांगावे म्हणजे विरोधकांची तोंडे पुन्हा उघडली जाणार नाहीत. मुंबईतले लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. ही व्यवस्था सुधारण्यासाठी रेल्वे यंत्रणेने लक्ष द्यावे.