Join us

नरेंद्र मोदी 'ढोंगीजीवी', काँग्रेस नेत्यानं पंतप्रधानांवर चालवला शाब्दीक आसूड

By महेश गलांडे | Published: February 14, 2021 3:40 PM

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात काही आंदोलनजीवी लोकं बसल्याचे मोदींनी संसदेतील आपल्या भाषणात बोलताना म्हटले होते. त्यानंतर, विरोधकांसह शेतकरी नेत्यांनीही मोदींच्या या शब्दाला आक्षेप घेत, मोदींवर टीका केली होती.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेतील आपल्या भाषणात शेतकरी आंदोलनावरुन काही आंदोलकांना फक्त एवढंच काम उरलंय, अस म्हटलं होतं. समाजात आता आंदोलनजीवी नावाची नवीन जमात उदयास आल्याचं ते म्हणाले. त्यानंतर, देशभरातून मोदींच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर टीका करण्यात आली. नुकतेच काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले नाना पटोले यांनी मोदींना ढोंगी म्हणत त्यांच्या आंदोलनजीवी या शब्दाला प्रत्युत्तर दिलंय. नाना पटोलेंनी ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनातील आणि बैलगाडी हाकतानाचे फोटो शेअर करत मोदींना लक्ष्य केले.  

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात काही आंदोलनजीवी लोकं बसल्याचे मोदींनी संसदेतील आपल्या भाषणात बोलताना म्हटले होते. त्यानंतर, विरोधकांसह शेतकरी नेत्यांनीही मोदींच्या या शब्दाला आक्षेप घेत, मोदींवर टीका केली होती. आता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदींवर आंदोलनजीवी या शब्दावरून टीकास्त्र सोडले आहे. 'नरेंद्र मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांचा आंदोलनजीवी म्हणून अपमान केला. त्याचा समाचार घेत सत्तेसाठी ढोंग करणारे, सोंग करणारे मोदी हे "ढोंगीजीवी", असे ट्विट नाना पटोले यांनी केलंय. 

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलंय. माजी केद्रीयमंत्री शशी थरुर यांनीही ट्विट करुन आंदोलनजीवी या शब्दावरुन भाजपाला खोचक टोला लगावला होता. त्यानंतर, काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनीही मोदींवर आंदोलनजीवी शब्दावरुन टीका केलीय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही या शब्दाचा समाचार घेतला आहे. आता, नाना पटोलेंनी मोदींवर शाब्दीक आसूड चालवलाय. 

शशी थरुर यांनीही लगावला टोला

बाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का? असा खोचक प्रश्न शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमधून विचारला आहे. मोदींनी संसदेत आंदोलनजीवी या शब्दाचा उत्सुकतेनं उल्लेख केला. पण, या आंदोलकांसाठी हा शब्द निष्ठूर नाही का? असे ट्विट थरुर यांनी केली आहे. दिल्लीतील जनलोकपाल आंदोलनाचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला बसला आहे. त्यामुळे, या आंदोलनातील प्रमुख अण्णा हजारे, किरण बेदी आणि बाबा रामदेव यांच्या सहभागावरुन थरुर यांनी हा टोमणा मारणारे ट्विट केलंय.

काय म्हणाले होते पंतप्रधान

आम्ही 'बुद्धीजीवी' हा शब्द ऐकला होता. परंतु आता काही लोकं 'आंदोलनजीवी' झाले आहेत. देशात काहीही झालं की ते त्या ठिकाणी पोहोचतात. कधी ते पडद्याच्या मागे असतात तर कधी पुढे. अशा लोकांना ओळखून आपल्यालाला त्यांच्यापासून वाचायला हवं, असं म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी निशाणा शाधला. "जे आंदोलनजीवी लोकं आहेत ते स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत. परंतु कोणाचं आंदोलन सुरू असेल तर ते त्या ठिकाणी पोहोचतात. ही लोकं कोणत्याही ठिकाणी सापडतात. वकिलांच्या आंदोलनात वकीलांसोबत ते दिसतील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाही," असंही मोदी म्हणाले. सध्या नवा FDI आला आहे. त्या 'फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी'पासून आपल्याला वाचलं पाहिजे, असंही आंतरराष्ट्रीय कटाबद्दल बोलताना मोदींनी नमूद केलं. 

संजय राऊत यांचा निशाणा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युतर दिलंय. विशेष म्हणजे गर्व से कहो हम हिंद है... या घोषवाक्याचं रुपांतरच त्यांनी आंदोलनजीवी या शब्दाशी जोडून केलंय. त्यामुळे, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न राऊत यांनी केलाय. राऊत यांनी ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टीकैत यांच्या समवेतचा फोटो शेअर केला आहे. तसेच, गर्व से कहो हम आंदोलनजीवी है... जय जवान- जय किसान असेही राऊत यांनी म्हटलंय. तसेच, मराठीतही याच आशयाचे ट्विट राऊत यांनी केलंय.

आंदोलनजीवीवरुन अमोल कोल्हेंचा भाजपाला चिमटा

देशाला आजतर दोन नवे शब्द मिळाले आहेत, त्यातला एक आहे आंदोलनजीवी. मी या शब्दाबद्दल अतिशय आभारी आहे.कारण महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते,त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला या शब्दामुळे समजलं. पण, ज्या कष्टकरी वर्गासाठी बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही ठामपणे उभे राहतात, ते मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे, त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो.  

टॅग्स :नरेंद्र मोदीकाँग्रेसनाना पटोले