Join us

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 9:58 PM

मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रिपाइं नेते रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

श्रीकांत जाधव, मुंबई : संपूर्ण देशात मोदी सरकारबद्दल चांगले वातावरण आहे. उत्तर भारतात ७५ पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल. जनतेची चांगली साथ मोदींना आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. मात्र, महाराष्ट्रात ‘काटे की टक्कर’ असल्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले. शुक्रवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रिपाइं नेते रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रामदास आठवले म्हणाले, येत्या ४ जूनला लोकसभेचा निकाल आहे. त्यात मोदींच्या ‘चारशे पार’च्या नाऱ्यावर विजयाचा शिक्कामोर्तब होणार आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीने दलित मुस्लीम जनतेत संभ्रम निर्माण केला. नरेद्र मोदी मुस्लीम विरोधी आहेत अशा अफवा उठविल्या. या अफवांचा ४ तारखेला चक्काचूर होणार आहे. राहुल गांधी खोटे ठरणार आहेत. नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नक्की होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार मागास जाती म्हणून ओबीसींना आरक्षण देण्यात आले आहे. ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम जातींना आरक्षण मिळत आहे. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख कोणत्याही धर्माच्या आधारे आरक्षण देऊ नये ही संविधानाची भूमिका आहे, तीच भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. देशभरात रिपब्लिकन पक्षाने मोदींची साथ दिली आहे. त्यामुळे केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, असा मला शब्द देण्यात आला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत आम्ही ८ ते १० जागांची मागणी करणार आहोत. दोन मंत्रिपदही आम्हाला हवी आहेत, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :रामदास आठवले