नरेंद्र मोदी यांचा गावागावात आणि घराघरात वीज पोहोचल्याचा दावा फोल - संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 06:12 PM2018-05-02T18:12:45+5:302018-05-02T18:12:45+5:30
भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गावागावात व घराघरात वीज दावा फोल आहे. भाजपा सरकार खूप मोठी आणि खोटी फक्त जाहिरातबाजी करत आहे, संपूर्ण देशात घरा घरात १०० टक्के वीज पोहचली आहे. परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे, असा घणाघाती आरोप...
मुंबई - भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गावागावात व घराघरात वीज दावा फोल आहे. भाजपा सरकार खूप मोठी आणि खोटी फक्त जाहिरातबाजी करत आहे, संपूर्ण देशात घरा घरात १०० टक्के वीज पोहचली आहे. परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे, असा घणाघाती आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.
बोरिवली पश्चिम हद्दीतील गोराई गावातील जामझाड आदिवासी पाड्यामध्ये पिढ्या न पिढ्या वीज नाही आहे. सुमारे १५०० ते २००० लोकसंख्या असलेले हे ५ आदिवासी पाडे असून येथे गेली ७० वर्षे वीज नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिथे वर्षा बंगल्यावर राहतात तेथून हा जामझाड पाडा आदिवासी लोकांचा पाडा अवघ्या ३० कमी अंतरावर आहे परंतु इथे वीज अजिबात नाही. ते अनेक वर्षे संघर्ष करत आहेत परंतु त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. गेली चार वर्षे यांची सत्ता असून काहीच फायदा गरीब आणि आदिवासी याना होत नाही आहे. फक्त जाहिरात बाजी आणि जुमले बाजी हे सरकार करत आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेला आहे. संजय निरुपम यांनी काँग्रेसचे माजी नगरसवेक शिवा शेट्टी यांच्यासहित अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या जामझाड पाड्याला भेट देऊन सर्व समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.
संजय निरुपम पुढे म्हणाले कि गेली अनेक वर्षे हे आदिवासी लोक विजेसाठी तडफडत आहेत आणि भाजपा सरकार फक्त खोटे आदेश आणि खोटी आश्वासने देत आहेत. खोटी जाहिरातबाजी करत आहेत. कामे पूर्ण करता येत नसेल तर कृपया खोटी जाहिरातबाजी तरी नका करू, अशी आमची इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून एक खोटी माहिती आणि जाहिरातबाजी करत आहेत ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हगणदारीमुक्त झालेला आहे. परंतु वास्तव हे नाही आहे, याच आदिवासी पाड्यांमध्ये वीज तर नाहीच परंतु टॉयलेटही नाही आहे. येथील सर्वांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा हि दावा फोल ठरलेला आहे. दरवर्षी या सरकारचे २५०० हजार कोटी शौचालय बांधण्यासाठी बजेट आहे. परंतु अजूनही गरीब जनता टॉयलेटपासून वंचित आहेत. अजून हि या देशातील महिला उघड्यावर शौच करतात हि खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. या आदिवासी पाड्यांमध्ये वीज, शौचालय आणि पाणी नाही. मुंबईतील बोरिवली हद्दीत गोराई येथे हि अवस्था आहे. हे क्षेत्र हगणदारीमुक्त नाही आहे. आणि भाजप सरकार मात्र संपूर्ण देश हगणदारी मुक्त आणि घरा घरात वीज अशा खोट्या घोषणा करत आहेत, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.