नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अंबानींचे दलाल, काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 07:53 PM2018-07-30T19:53:39+5:302018-07-30T19:54:04+5:30

अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला राफेल विमान कराराच्या दहा दिवस अगोदर मान्यता मिळाली.

Narendra Modi's Reliance Ambani's broker, Congress's serious charge | नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अंबानींचे दलाल, काँग्रेसचा गंभीर आरोप

नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अंबानींचे दलाल, काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई- नरेंद्र मोदी हे चौकीदार नसून घोटाळ्यांमध्ये भागीदार आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींसाठी दलालीचे काम करत आहेत. नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अनिल अंबानींचे दलाल आहेत. अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला राफेल विमान कराराच्या दहा दिवस अगोदर मान्यता मिळाली. ज्या कंपनीला विमानाचा नट बोल्ट बनवायचा देखील अनुभव नाही. त्या कंपनीला नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राफेल विमान खरेदी व्यवहार करण्याचे काम दिले. संरक्षण मंत्री, इंडियन एअर फोर्स, भारतीय सुरक्षा विभाग यांच्याशी कोणतीही चर्चा न करता नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी फ्रान्समध्ये जाऊन हा करार केला. नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अनिल अंबानींचे दलाल असल्याचा आरोपही संजय निरुपम यांनी केला आहे. 

१२ डिसेंबर २०१२ रोजी काँग्रेससरकारच्या काळात डिसॉल्ट एव्हिएशनने जाहीर केलेल्या राफेल विमानांच्या बोली दरम्यान राफेल विमानांची किंमत प्रत्येकी ५२६.१० कोटी रुपये म्हणजेच ३६ विमानांची किंमत १८,९४० कोटी रुपये ठरवण्यात आली होती. पण मोदी सरकारने हीच विमाने प्रत्येकी १६७०.७० करोड रुपये या दराने म्हणजेच ३६ विमाने रु. ६०,१४५ कोटी रुपयांना खरेदी केली. भाजप सरकारच्या २०१६ च्या वार्षिक अहवालामध्ये ही किंमत नमूद केलेली आहे. जास्त गेलेल्या ४१,२०५ कोटी रुपये जे भारतीय जनतेच्या खिशातून गेलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रक्षामंत्री निर्मला सीतारामन या कराराविषयी सर्व माहिती लपवून ठेवत आहे. खरी किंमत सांगण्यास तयार नाहीत. यावरून या करारामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे, हे स्पष्ट होत आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

मुंबई काँग्रेसतर्फे राफेल विमान खरेदी घोटाळ्याच्या निषेधार्थ फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान ह्लमोर्चाह्व काढण्यात आला होता. त्यावेळेस ते बोलत होते. या मोर्चामध्ये संजय निरुपम यांच्या सोबत माजी खासदार एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर, आमदार अस्लम शेख, अमिन पटेल, माजी आमदार चरणसिंग सप्रा, चंद्रकांत हंडोरे, अशोक जाधव, जिल्हाध्यक्ष बलदेव खोसा, मनपा विरोधी पक्ष नेते रवि राजा, उत्तम खोब्रागडे, सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अजंता यादव, कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, संसदेमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल विमान खरेदीविषयी माहिती सांगण्याची मागणी केली. परंतु नरेंद्र मोदी राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगून माहिती लपवत आहेत. विमानांची खरी किंमत सुद्धा नरेंद्र मोदी लपवत आहेत. राफेल विमान खरेदी व्यवहाराची माहिती जनतेसमोर उघड करू नये, असे फ्रांस सरकारने कधीही सांगितले नाही. तांत्रिक माहिती सोडल्यास कराराबाबत सर्व माहिती सांगण्यास फ्रांस सरकारची काहीच हरकत नाही. पण तरीसुद्धा नरेंद्र मोदी कराराची माहिती लपवत आहेत. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या विमान क्षेत्रातील कोणतीही माहिती नसलेल्या कंपनीला हा व्यवहार पूर्ण करण्याची मंजुरी दिली. संरक्षण मंत्री, इंडियन एअर फोर्स, भारतीय सुरक्षा विभाग यांच्याशी कोणतीही चर्चा न करता नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी फ्रान्समध्ये जावून हा करार केला. हा खूप मोठा घोटाळा आहे. हा घोटाळा नरेंद्र मोदि आणि निर्मला सीतारामण यांना गोत्यात आणणार आहे. या व्यवहारामध्ये फक्त शस्त्रास्त्रांची तांत्रिक आणि रणनीतीक माहितीबाबत गोपनीयता पाळण्याबाबत नमूद करण्यात आलेले आहे. पण यामध्ये कुठेही या व्यवहाराच्या खर्चाची माहिती जनतेसमोर उघड करू नये असे कुठेही लिहिलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण जनतेची दिशाभूल करत आहेत.



या घोटाळ्याची संपूर्ण माहिती जनतेला कळण्यासाठी काँग्रेसतर्फे मुंबईतील प्रत्येक विभागात असेच मोर्चे काढण्यात येणार आहेत. राफेल विमानाची प्रतिकृती घेऊन आमचे कार्यकर्ते मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकावर उभे राहून जनतेला या घोटाळ्याची माहिती देणार आहेत, अशी माहिती मुंबई कॉंगेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

Web Title: Narendra Modi's Reliance Ambani's broker, Congress's serious charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.