नरेश गोयल यांच्या ईडी कोठडीत १४ सप्टेंबर पर्यंत वाढ
By रतींद्र नाईक | Published: September 11, 2023 06:32 PM2023-09-11T18:32:54+5:302023-09-11T18:33:02+5:30
ईडीने गोयल यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे मारले.
मुंबई: कॅनरा बँकेची ५३८ कोटींना फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची ईडी कोठडी संपुष्टात आल्याने सोमवारी त्यांना सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने गोयल यांच्या ईडी कोठडीत १४ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.
कॅनरा बँकेने जेट एअरवेजला ७२८ कोटी रुपायांच्या कर्जापैकी ५३८ कोटी ६२ लाख कर्ज कंपनीने थकवल्या प्रकरणी बँकेने सीबीआय कडे लेखी तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने गुन्हा दाखल केला. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने नरेश गोयल यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने गोयल यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे मारले.
सोमवारी दुपारी त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात न्यायाधीश एस बी जोशी यांच्या समोर हजर करण्यात आले. तेव्हा, ईडीच्या वतीने ऍड सुनील गोंन्साल्विस यांनी बाजू मांडत गोयल यांच्या अधिकच्या चौकशीसाठी त्यांची कोठडी वाढवावी अशी मागणी केली. तर गोयल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद करत गोयल यांचे वय आणि आरोग्य पाहता त्यांना खासगी रुग्णालयात दाखल होण्याची मुभा द्यावी अशी विनंती केली न्यायालयाने मात्र दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत गोयल यांच्या ईडी कोठडीत १४ सप्टेंबर पर्यंत वाढ केली