नरिमन पॉइंट-अहमदाबाद ‘कोस्टल फ्री वे’ शक्य
By admin | Published: October 23, 2015 03:19 AM2015-10-23T03:19:30+5:302015-10-23T03:19:30+5:30
महापालिकेमार्फत नरिमन पॉइंट ते कांदिवली जंक्शनपर्यंत राबविण्यात येणारा प्रस्तावित मुंबई सागरी किनारा रस्ता सरकार दरबारी विचाराधीन आहे. परंतु एका
मुंबई : महापालिकेमार्फत नरिमन पॉइंट ते कांदिवली जंक्शनपर्यंत राबविण्यात येणारा प्रस्तावित मुंबई सागरी किनारा रस्ता सरकार दरबारी विचाराधीन आहे. परंतु एका सजग मुंबईकराने नरिमन पॉइंट ते अहमदाबाद असा कोस्टल फ्री वे उभारण्याचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला आहे. पश्चिम उपनगर ते ठाणे पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा फ्री वे प्रत्यक्षात आल्यास पश्चिम उपनगरांतूनही प्रवास सुसाट होणार आहे.
पश्चिम उपनगरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतून पश्चिम उपनगरात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेसह पश्चिम महामार्ग आणि अन्य पर्यायी मार्गांवर अवलंबून राहावे लागते. पश्चिम उपनगरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी शासनाने नरिमन पॉइंट ते कांदिवली जंक्शनपर्यंत मुंबई सागरी किनारा रस्ता उभारण्याचे ठरविले आहे. परंतु या मार्गामुळे अनेक तिवरांचा बळी जाणार आहे. तसेच समुद्रातही भराव टाकला जाणार आहे. या मार्गाला पर्याय म्हणून शासनाने नरिमन पॉइंट ते अहमदाबादपर्यंत कोस्टल फ्री वे उभारल्यास मुंबईकरांना याचा अधिक लाभ होईल. तसेच यामुळे पर्यावरणाची हानीदेखील रोखता येईल, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे.
पर्यावरण आणि वन विभागाच्या समितीचे माजी अध्यक्ष अजित माथूर यांनी नरिमन पॉइंट ते अहमदाबाद महामार्ग अशा कोस्टल फ्री वेचा प्रस्ताव मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांना सादर केला आहे. हा मार्ग मीरा-भार्इंदरमार्गे ठाणे-घोडबंदर रोड येथून अहमदाबादपर्यंत सुचविण्यात आला आहे. हा कोस्टल फ्री वे मार्ग सात टप्प्यांमध्ये राबविता येणे शक्य असून सुमारे तीन वर्षांमध्ये तो प्रत्यक्षात येऊ शकेल. या प्रकल्पात तिवरांच्या झाडांचेही संरक्षण होऊन पर्यावरणाचा ऱ्हास रोखता येणार असल्याचा दावा माथूर यांनी केला आहे.
कोस्टल फ्री वेसह या मार्गावर जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅकही उभारण्यात येणार आहे. एकूण ८ मार्गिकांचा हा मार्ग मार्वे ते मढ, वर्सोवा ते मढ, बोरीवली ते गोराई असा उड्डाणपुलाद्वारे जोडण्यात येणार आहे. हा मार्ग १५ ते १७ किलोमीटरचा असून तो समुद्राच्या बाजूने बांधता येईल. त्यासाठी समुद्रातून दीड किलोमीटर अंतरापासून वांद्रे ते वर्सोवापर्यंत स्टील ब्रिज बांधता येईल. त्यामुळे मुंबईच्या सांैदर्यात भर पडणार असल्याचेही माथूर यांनी सांगितले.
कोस्टल फ्री वेसह या मार्गावर जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅकही उभारण्यात येणार आहे. एकूण ८ मार्गिकांचा हा मार्ग मार्वे ते मढ, वर्सोवा ते मढ, बोरीवली ते गोराई असा उड्डाणपुलाद्वारे जोडण्यात येणार आहे. हा मार्ग १५ ते १७ किलोमीटरचा असून तो समुद्राच्या बाजूने बांधता येईल.या प्रस्तावाबाबत पालिका आयुक्तांना माहिती देण्यासाठी माथूर यांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे वेळ मागितली आहे.