ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - सारा जॉन थॉमस या बोरिवलीतील नारायणा ई-टेक्नो स्कूलमध्ये शिकणा-या विद्यार्थिनीने नासा स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट २०१७ या नासा आणि एएमईएस रिसर्च सेंटर आणि नॅशनल स्पेस सोसायटी, यूएसने आयोजित केलेल्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
तिने सादर केलेल्या झीऑन- द हेवन्ली सिटी या प्रोजेक्टसाठी तिला हे पारितोषिक प्राप्त झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी पुन्हा हे पारितोषिक मिळाले असून २०१६ मध्येही याच स्पर्धेत तिच्या या प्रोजेक्टला तिसरा क्रमांक मिळाला होता.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांना अंतराळामध्ये राहण्यासाठी पृथ्वीप्रमाणेच वातावरण निर्माण करण्यासाठी प्रोजेक्ट तयार करण्यास सांगितले जाते. लोअर अर्थ ऑर्बिट (लिओ)मध्ये राहण्यासाठी अनुकूल ठरणारा हा झीऑन हा प्रकल्प साराने बनवला आहे. यंदा सहा हजार विद्यार्थ्यांनी (वैयक्तिक किंवा सामूहिक) १५०० प्रोजेक्ट या स्पर्धेत सादर केले. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये साराच्या प्रोजेक्टची निवड दुसऱ्या क्रमांकासाठी झाली आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.