Join us

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : अटीतटीच्या लढतीत नसीम खान हरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 2:50 AM

- सचिन लुंगसे मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी सभा घेतलेल्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ...

- सचिन लुंगसे मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी सभा घेतलेल्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नसीम खान हे निश्चितच विजयी होतील, असा दावा केला जात होता. दस्तुरखुद्द नसीम खान यांनीदेखील आपण बहुमताने विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांनी घेतलेल्या आठ-एक हजार मतांसह शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी केलेल्या अपार कष्टापुढे नसीम खान यांच्या कष्टाचे चीज झाले नाही; आणि अखेर नसीम खान यांचा पराभव झाला.

तब्बल २० वर्षांपासून नसीम खान येथे आमदार होते. नसीम यांची चांदिवली विधानसभेवर मजबूत पकडही होती. २०१४ साली आलेल्या ‘मोदी लाटे’तही नसीम यांनी आपला गड शाबूत ठेवला होता. २०१९ सालीही आपला विजय होईल, अशी खात्री नसीम यांना होती. विधानसभेचा अर्ज भरतेवेळी नसीम यांनी तसे शक्तिप्रदर्शनही केले होते. मतदान होईपर्यंत नसीम यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता.

मात्र याच काळात नसीम यांच्यासमोर आव्हान उभे राहिले ते शिवसेनेचे दिलीप लांडे, मनसेचे सुमित बारस्कर, वंचित बहुजन आघाडीचे अबुल हसन खान आणि आपचे सिराज खान यांचे. सिराज यांनी येथे अगदीच सुमार कामगिरी केली. त्यांना अवघी ७२९ मते मिळाली.नसीम खान यांना ८५ हजार ४७० मते मिळाली. दिलीप लांडे यांना ८५ हजार ८७९ मते मिळाली. सुमीत बारस्कर यांना ७ हजार ९८ मते मिळाली. अबुल हसन खान यांना ८ हजार ८७६ मते मिळाली. गुरुवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली; आणि पहिल्या फेरीपासूनच दिलीप लांडे यांनी आघाडी घेतली.

पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या फेरीदरम्यान नसीम यांनी किंचित आघाडी घेतली. नंतर पुन्हा लांडे आघाडीवर राहिले. पंचविसाव्या फेरीपूर्वीच्या दोन ते तीन फेऱ्यांत पुन्हा नसीम खान हजारएक मतांच्या फरकाने आघाडीवर आले; आणि एवढ्या वेळ पिछाडीवर असलेले नसीम आता जिंकणारच असे चित्र निर्माण झाले. मात्र २५ व्या फेरीत दिलीप लांडे यांनी घेतलेल्या आघाडीने भल्याभल्यांना गार केले.

मनसेतून हारले शिवसेनेत जिंकले

आता चांदिवलीतून शिवसेनेतर्फे विजयी झालेल्या दिलीप लांडे यांनी २००९ साली चांदिवलीतूनच मनसेतर्फे निवडणूक लढविली होती. तेव्हा लांडे यांना ४८ हजार ९०१ मते मिळाली होती. त्यांचा पराभव झाला. पण लांडे यांनी हार मानली नाही. २०१४ साली लांडे घाटकोपर पश्चिम विधानसभेतून मनसेतर्फेच उभे राहिले. तेव्हा त्यांना १७ हजार २०७ मते मिळाली. त्यांचा पराभव झाला. तरीही लांडे यांनी हार मानली नाही.

२०१९ साली लांडे शिवसेनेतर्फे चांदिवलीतून उभे राहिले. आता मात्र त्यांनी चिकार मेहनत घेतली. शिवसेना नेते अनिल परब हे लांडे यांच्यासाठी स्वत: मैदानात उतरले. तर दुसरीकडे थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची नसीम खान यांच्यासाठी चांदिवलीत सभा झाली. राहुल यांच्या सभेनंतर आता चांदिवली आपलीच; असा दावाही काँग्रेसने केला. प्रत्यक्षात उमेदवारांनी आपले मत लांडे यांच्या पारड्यात टाकत शिवसेनेला विजयी केले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019चांदिवलीशिवसेना