Join us

नसीम खान यांची दिलीप लांडे यांच्याविरोधात निवडणूक याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात उच्च ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खान हे चांदीवली मतदारसंघातून ४०९ मतांनी लांडे यांच्याकडून पराभूत झाले होते. खान यांनी निवडणूक याचिकेत म्हटले आहे की, २० ऑक्टोबर २०१९ रोजी शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचे जवळचे सहकारी आणि सध्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचाराच्या मुदतीनंतर प्रचार केला होता. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान घेण्यात आले होते.

तसेच प्रचारादरम्यान आपण ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे खोटे व्हिडिओ सगळीकडे प्रसारित करण्यात आले, असेही खान यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

प्रत्यक्ष मतदानाला ४८ तास उरले असताना प्रचार न करण्याचा निवडणूक आयोगाचा नियम असताना ठाकरे यांनी हा नियम मोडला. बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेमुळे लांडे ४०९ मतांनी निवडून आले, असे खान यांनी याचिकेत म्हटले आहे.