Nashik Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून अजून तिढा कायम आहे. शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत नाशिकच्या जागेच उल्लेख नव्हता. यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. महायुतीमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरू असून दुसरीकडे, शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी दोन दिवसापूर्वी ठाण्यात कार्यकर्त्यांसह येऊन शक्तिप्रदर्शन केलं होतं. अजित पवार गटाने साताऱ्याच्या बदल्यात नाशिकच्या जागेची मागणी केली आहे. दरम्यान, आज या जागेबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
"लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता, मी मागणीही केली नव्हती. पण, दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अचानक माझं नाव समोर आलं. जो निर्णय वरिष्ठ घेतील तो निर्णय मला मान्य असल्याचे सांगत, नाशिक लोकसभा लढवण्याचे स्पष्ट संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. 'महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीने काम करणार. जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली तर राष्ट्रवादीचे घड्याल हीच निशाणी असणार, असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात
महायुतीमध्ये आता नाशिकची शिवसेनेची जागा धोक्यात आली आहे. हेमंत गोडसे यांचा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. हेमंत गोडसे कालही ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते. हेमंत गोडसे यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी हेदेखील असून श्रीकांत शिंदे यांच्याशीही नाशिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. कालपासून गोडसे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी पोहचलेत परंतु अद्याप ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे नाराज झालेले गोडसे ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलेत. या जागेबाबत हेमंत गोडसे म्हणाले की, मतदार संघात फेरी पूर्ण झाली आहे. काम सुरू करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. शिवसेनेला १८ जागा मिळाव्यात हा आमचा आग्रह आहे. प्रत्येक पक्षाला जागेवर दावा करण्याचा हक्क आहे. माझ्या मनात धाकधुक नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत हा १०० टक्के विश्वास आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आजही खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. १००१ टक्के नाशिकमधून मलाच उमेदवारी मिळेल असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १३ खासदार हे पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदेसोबत आले होते. त्यात नाशिकच्या हेमंत गोडसेंचाही समावेश होता. शिवसेनेने लोकसभेची पहिली यादी जाहीर केली. त्यात ८ जणांची नावे आहेत. त्यातील रामटेकचे कृपाल तुमाने यांच्याऐवजी राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. आणखी काही जागा शिवसेनेला मिळतील. परंतु नाशिकच्या जागेवरून भाजपाचा आणि राष्ट्रवादीचा आग्रह कायम असल्याने अद्याप या जागेवरील उमेदवाराची घोषणा झाली नाही.