मुंबई - एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत काही रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे.
"ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. यात जीवितहानी झाल्यानं मन हेलावलं आहे. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांचं सांत्वन," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शोक व्यक्त केला. तर, चंद्रकांत पाटील यांनीही घटनेच्या सखोल चौकशीही मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही घटनेची सखोल चौकशी होणारच, असं सांगत कोणीही राजकारण करू नये, असे म्हटलंय.
राज ठाकरेंकडूनही शोक व्यक्त
नाशिकच्या दुर्घटनेवर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं अशी मागणी त्यांनी केली आहे.