नालेसफाई की हातसफाई? मुंबई पालिकेच्या ९० टक्के सफाईच्या दाव्यानंतरही नाले अद्याप गाळातच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 02:31 AM2019-06-02T02:31:36+5:302019-06-02T02:31:57+5:30
मुंबईच्या उपनगरातील मानखुर्द नाला असो, कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदी असो, वाकोला नाला असो वा पश्चिम उपनगरातील बहुतांशी नाले असोत; येथे अद्यापही म्हणावी तशी साफसफाई झालेली नाही
मुंबई : मुंबई महापालिका पावसाळी कामे कधीच वेळेत पूर्ण करत नाही. रस्ते असो, नाले असो वा छोटी मोठी गटारे असो, अशी अनेक कामे प्रत्येक पावसाळा तोंडावर आला, तरी अर्धवटच असतात. परिणामी, मुंबईकरांना प्रत्येक पावसाळ्यात पुराचा फटका बसतो. या पावसाळ्यातही अशीच अवस्था आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबईत ९० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिका करत असली, तरीदेखील मुंबई ठिकठिकाणी नालेसफाई झाली नसल्याचे स्पष्ट चित्र आहे.
मुंबईच्या उपनगरातील मानखुर्द नाला असो, कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदी असो, वाकोला नाला असो वा पश्चिम उपनगरातील बहुतांशी नाले असोत; येथे अद्यापही म्हणावी तशी साफसफाई झालेली नाही. २०१७ मध्ये डोंगरावरून मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा फटका श्रीकृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सवाला बसला होता. येथील संरक्षक भिंत जमीनदोस्त झाली. येथील नागरिकांच्या घरात व बंगल्यात पाणी जाऊन मोठे वित्तीय नुकसान झाले, तर रावळ पाडा येथील तांबे गल्लीजवळील सरस्वती चाळ येथील तुंबलेल्या नाल्यात गेल्या वर्षी मुलगा वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
नालेसफाईबाबत आर-उत्तर व आर-मध्य येथील प्रभाग समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांनी महापालिकेला पत्र लिहून पावसाळ्यापूर्वी येथील नालेसफाई पूर्ण करा, असे म्हटले होते. गेले दोन दिवस येथील नालेसफाईच्या कामाची आमदार प्रकाश सुर्वे व संध्या दोशी यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे, या वेळी वॉर्ड आॅफिसर, पालिका अधिकारी, एमएमआरडीएचे संबंधित अधिकारी हजर नव्हते. पाहणीत येथील नालेसफाई पूर्ण झाली नसून नाले गाळाने भरलेले आहेत. मात्र, कागदोपत्री नालेसफाई झाल्याचा आर-उत्तरचा अहवाल हा फक्त कागदावरच आहे.
नालेसफाई ही निव्वळ धूळफेक असून, पालिका प्रशासन व नालेसफाईचे काम करणारे कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप केला जात आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणी भेट घेणार असून, येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.
पालिका म्हणते, दर आठ दिवसांनी साफसफाई
आर उत्तरच्या सहायक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यासंदर्भातील आरोप फेटाळून लावले. आर उत्तर वॉर्डमध्ये ९० टक्के नालेसफाई झाली आहे. मीनाक्षी मार्बल नाला हा दर आठ दिवसांनी साफ केला जात असून, येथील कारखानदार तसेच नागरिक नाल्यात कचरा टाकतात. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या आदेशाने त्यांनी कचरा टाकल्याचे आढळल्यास त्यांचे पाणी कापण्यात येईल. पालिकेच्या हद्दीतील हा नाला साफ केला असून, उलट एमएमआरडीएच्या हद्दीतील नाला त्यांनी साफ केला नाही. आमदार सुर्वे यांच्या नालेसफाईची पूर्वकल्पना आपल्याला प्रभाग समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी दिली नव्हती.
आर उत्तर विभागात प्रभाग क्रमांक ३ मध्ये वैशालीनगर नाला, प्रभाग क्रमांक ४ मध्ये मीनाक्षी मार्बल नाला, रावळ पाडा येथील तांबे गल्लीजवळील सरस्वती चाळ येथील नाला, घरटन पाडा नंबर २ चोगले चाळ व पाटील चाळ येथील नाले येतात. प्रभाग क्रमांक ५ मध्ये संगमेश्वर इमारत आणि बाजूच्या परिसराजवळील नाला, अशोकवन नॅन्सी वसाहत हे नाले येतात. येथील मीनाक्षी मार्बल नाला हा गाळाने भरला आहे. नाल्यात पावसाळ्यात प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये डोंगरातून पाणी नाल्यात येते. पश्चिम द्रुतगती महामार्गावर या नाल्याची रुंदी कमी होऊन दरवर्षी येथे पाणी तुंबते.
आर मध्य वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक १० येथील वाहणाऱ्या दहिसर नदीच्या लगत असलेला श्रीकृष्णनगर नाला, प्रभाग क्रमांक १२ मधील आम्ब्रोसिया इमारत, ओबेरॉय आणि मागाठाणे मेन नाला व बोरीवली पूर्व येथील मागाठाणे बस डेपो समोरील टाटा पॉवर मुख्य नाला ते फुलपाखरू उद्यान येथील नाले आजही सांडपाणी भरून वाहत असून, पावसाळ्यात तर नाल्यावरून तुडुंब पाणी वाहते आणि गुडघाभर पाणी साचते.