रंगकर्मी आंदोलक करणार नटराजाची महाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:05 AM2021-08-29T04:05:59+5:302021-08-29T04:05:59+5:30

राज चिंचणकर कोरोनाच्या प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या रंगकर्मींची योग्य ती दखल घेण्यात आली नाही. तसेच नाट्य व चित्रपटगृहे बंद असल्याने ...

Nataraja's Maha Aarti will be performed by Rangkarmi Andolank | रंगकर्मी आंदोलक करणार नटराजाची महाआरती

रंगकर्मी आंदोलक करणार नटराजाची महाआरती

Next

राज चिंचणकर

कोरोनाच्या प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या रंगकर्मींची योग्य ती दखल घेण्यात आली नाही. तसेच नाट्य व चित्रपटगृहे बंद असल्याने सगळ्यांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या मंचाखाली एकवटलेल्या रंगकर्मींनी आता पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३० ऑगस्ट रोजी राज्यातील नाट्यगृहे व चित्रपटगृहांसमोर रंगकर्मी नटराजाची महाआरती करणार आहेत.

मुंबईत ही महाआरती शिवाजी मंदिर नाट्यगृहासमोर सायंकाळी सात वाजता केली जाणार आहे.

रंगकर्मींच्या मागण्यांच्या संदर्भात, ९ ऑगस्ट रोजी रंगकर्मींनी आंदोलन केले होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्र्यांशी भेट घेतलेल्या रंगकर्मींच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. यातूनच १ सप्टेंबरला नाट्यगृहे उघडण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही रंगकर्मींना मिळाले होते.

दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी रंगकर्मींच्या मागण्यांना तत्त्वत: मान्यता दिली आहे. पण सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती या मंचातर्फे देण्यात आली आहे.

या आंदोलनाचा पुढचा प्रवास ३० ऑगस्टपासून पुढे सुरू होणार आहे.

१ सप्टेंबरपासून नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू करण्याच्या सरकारकडून मिळालेल्या आश्वासनावर रंगकर्मींचा विश्वास आहे आणि ते सरकारने पाळावे. नाटक व सिनेमाचा पडदा १ सप्टेंबरलाच उघडावा यासाठी महाराष्ट्रातील नाट्यगृहे व चित्रपटगृहांसमोर ३० ऑगस्ट रोजी नटराजाची महाआरती केली जाणार आहे. रंगकर्मी त्यांच्या मागण्यांसाठी किती आग्रही आहेत, याची सरकारने नोंद घ्यावी यासाठी ही महाआरती होणार आहे, अशी माहिती या मंचातर्फे देण्यात आली.

Web Title: Nataraja's Maha Aarti will be performed by Rangkarmi Andolank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.