Join us

रंगकर्मी आंदोलक करणार नटराजाची महाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:05 AM

राज चिंचणकरकोरोनाच्या प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या रंगकर्मींची योग्य ती दखल घेण्यात आली नाही. तसेच नाट्य व चित्रपटगृहे बंद असल्याने ...

राज चिंचणकर

कोरोनाच्या प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या रंगकर्मींची योग्य ती दखल घेण्यात आली नाही. तसेच नाट्य व चित्रपटगृहे बंद असल्याने सगळ्यांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या मंचाखाली एकवटलेल्या रंगकर्मींनी आता पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३० ऑगस्ट रोजी राज्यातील नाट्यगृहे व चित्रपटगृहांसमोर रंगकर्मी नटराजाची महाआरती करणार आहेत.

मुंबईत ही महाआरती शिवाजी मंदिर नाट्यगृहासमोर सायंकाळी सात वाजता केली जाणार आहे.

रंगकर्मींच्या मागण्यांच्या संदर्भात, ९ ऑगस्ट रोजी रंगकर्मींनी आंदोलन केले होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्र्यांशी भेट घेतलेल्या रंगकर्मींच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. यातूनच १ सप्टेंबरला नाट्यगृहे उघडण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही रंगकर्मींना मिळाले होते.

दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी रंगकर्मींच्या मागण्यांना तत्त्वत: मान्यता दिली आहे. पण सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती या मंचातर्फे देण्यात आली आहे.

या आंदोलनाचा पुढचा प्रवास ३० ऑगस्टपासून पुढे सुरू होणार आहे.

१ सप्टेंबरपासून नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू करण्याच्या सरकारकडून मिळालेल्या आश्वासनावर रंगकर्मींचा विश्वास आहे आणि ते सरकारने पाळावे. नाटक व सिनेमाचा पडदा १ सप्टेंबरलाच उघडावा यासाठी महाराष्ट्रातील नाट्यगृहे व चित्रपटगृहांसमोर ३० ऑगस्ट रोजी नटराजाची महाआरती केली जाणार आहे. रंगकर्मी त्यांच्या मागण्यांसाठी किती आग्रही आहेत, याची सरकारने नोंद घ्यावी यासाठी ही महाआरती होणार आहे, अशी माहिती या मंचातर्फे देण्यात आली.