नाट्यकलेचा जागर स्पर्धेतील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी
By संजय घावरे | Published: May 31, 2024 06:21 PM2024-05-31T18:21:25+5:302024-05-31T18:21:32+5:30
भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये ३ जून रोजी बालनाट्य आणि ५ जून रोजी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहेत. अंतिम फेरीमध्ये नऊ बालनाट्ये आणि नऊ एकांकिका सादर केल्या जातील.
मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन या स्पर्धांची प्राथमिक फेरी या वर्षाच्या सुरुवातीला १६ केंद्रावर संपन्न झाली. आता बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार आहे.
भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये ३ जून रोजी बालनाट्य आणि ५ जून रोजी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहेत. अंतिम फेरीमध्ये नऊ बालनाट्ये आणि नऊ एकांकिका सादर केल्या जातील. अंतिम फेरीत जीर्णोद्धार, दगड, मिशन फ्युचर क्रॉप, काय ते जाणावे, विंडोज ९८, फुलपाखरु, म्हावरा गावलाय गो, खिडकी, देवाला पत्र हि बालनाट्ये सादर केली जातील. अनपेक्षित, वाटसरु, सिनेमा, निर्झर, नवस, अ डील, उर्मिलायण, व्हॉटस्अप, नारायणास्त्र या एकांकिका होतील.
सदर स्पर्धेतील अंतिम फेरीत निवड झालेल्या एकांकिकांना मार्गदर्शन करण्यासाठी नीरज शिरवईकर, मंगेश कदम, संतोष पवार, राजेश देशपांडे, विजय केंकरे, कुमार सोहोनी, अद्वैत दादरकर, चंद्रकांत कुळकर्णी, विजू माने यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन मार्गदर्शन केले आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या एकांकिकांना नामांकित ज्येष्ठ व श्रेष्ठ दिग्दर्शक मार्गदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच ही अंतिम फेरी उत्कंठवर्धक होणार आहे.