मुंबई - नवीन 'नथुराम गोडसे' या नाटकाच्या शीर्षकाचा वाद मिटला असला तरी, कॅापीराईटच्या खटल्याची सुनावणी ३० नोव्हेंबरला होणार आहे. अशातच मूळ नाटकातील नथुराम गोडसे नव्या रूपात रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'मी नथुराम गोडसे बोलतोय...!' या मूळ नाटकात सौरभ गोखले नथुरामच्या रूपात दिसणार आहे.
पहिल्या प्रयोगापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले 'मी नथुराम गोडसे बोलतोय...!' हे नाटक पुन्हा नव्या संचात रंगभूमीवर येण्यापूर्वी शरद पोंक्षे यांनी स्वतंत्रपणे 'नथुराम गोडसे' हे नाटक रंगभूमीवर आणले. मूळ नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी विनय आपटे यांचे बंधू लेखक-दिग्दर्शक विवेक आपटे यांच्याकडे नाटकाच्या पुर्नदिग्दर्शनाची धुरा सोपवत 'मी नथुराम गोडसे बोलतोय...!'च्या ८१७व्या प्रयोगाची तयारी सुरू केली. लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नावानेच त्यावेळी महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आणि नाटकावर बंदी आणण्याचे सत्र सुरू झाले. तरीही धुरत यांनी त्यावेळी यशस्वीपणे लढा दिला आणि नाटक न्यायदेवतेच्या दरबारातून रसिकांच्या दरबारात आणत विवादातून मुक्त केले. सेन्सॉरने संमती दिल्यानंतरही अनेकदा नाटकावर विविध पद्धतीने दबाव आणायचा राजकीय प्रयत्न झाला. नाटकाची बस सामानासकट जाळण्याचे प्रयत्न झाल्यानंतरही धुरत नाटकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. नवीन कलाकारांना त्यांनी या नाटकात त्यावेळी संधी दिली आणि नाटकाबरोबरच त्यांनाही मोठे केले. मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव माऊली प्रॉडक्शन्सने नाटक थांबवले तेव्हा ८१७ प्रयोग पूर्ण झाले होते. पुन्हा एकदा लवकरच ओरिजनल नाटकाचा ८१८ वा प्रयोग रंगभूमीवर सादर होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. सौरभ गोखलेच्या रूपात नथुरामचा शोध पूर्ण झाला.
नव्या संचातील नाटकात आकाश भडसावळे, चिन्मय पाटसकर, सुजित देशपांडे, तेजस बर्वे, स्वप्निल फडके, अमित जांभेकर, समर्थ कुलकर्णी, गौरव निमकर आदी कलाकारांच्या भूमिका आहे. संगीतकार अशोक पत्की, नेपथ्य प्रकाश परब, रंगभूषा प्रदीप दरणे, वेशभूषा नाना गुजर, दृक्श्राव्य संकलन अभिमान आपटे, ध्वनी संकेत रुपेश दुदम यांचे आहे.