‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळ मुंबईसह नवी मुंबईच्या महापौरांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:51 AM2017-08-14T05:51:00+5:302017-08-14T05:51:02+5:30
उच्च न्यायालयाने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आहेत.
मुंबई : उच्च न्यायालयाने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी प्रशासकीय स्तरावर व्हावी, यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि नवी मुंबई महौपार सुधाकर सोनवणे यांना भेटून निवेदन दिले. महापौरांनीही या संदर्भात प्रशासनास योग्य ती कृती करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासित केले आहे.
हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी म्हणाले की, ‘१५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी खरेदी केलेले कागदी आणि प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज त्याच दिवशी सायंकाळपासून रस्त्यावर, कचºयात, गटारात आदी ठिकाणी पडलेले आढळतात. प्लॅस्टिकचे ध्वज लवकर नष्ट होत नसल्याने, अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पाहावी लागते. या संदर्भात जनजागृती करण्याचे काम हिंदू जनजागृती समिती गेल्या १४ वर्षांपासून या उपक्रमातून करत आहे. त्यासाठी शाळा-शाळांत व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे, हस्तपत्रके वितरित करणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर सीडी दाखविणे, रस्त्यांवर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, सामाजिक संकेतस्थळाद्वारे मोहीम राबवणे आदी कृती या उपक्रमांतर्गत घेण्यात येत आहेत.’
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर व्यापक प्रबोधन करण्याची मागणी समितीने केली आहे, तसेच जिल्ह्यात प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन आणि त्याची विक्री होते का? याची खात्रीही करण्याचे आवाहन शासनाकडे करण्यात आले आहे. तसे होत असल्यास, संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी विनंती महापौरांना दिलेल्या निवेदनामध्ये केल्याचे धुरी यांनी सांगितले.