लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मराठमोळ्या रंगकर्मींच्या 'खिशात'...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:07 AM2021-03-25T04:07:25+5:302021-03-25T04:07:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या व्यतिरिक्त लघुपटांचे एक वेगळे विश्व आहे. यात अनेक जण आपापल्या परीने योगदान देत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या व्यतिरिक्त लघुपटांचे एक वेगळे विश्व आहे. यात अनेक जण आपापल्या परीने योगदान देत असतात आणि त्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली जाते. अशीच दखल जर राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली; तर या रंगकर्मींच्या श्रमाचे सार्थक होते. यंदा हे भाग्य 'खिसा' या लघुपटाच्या भाळी लिहिले गेले आणि मराठमोळ्या रंगकर्मींच्या या लघुपटाने राष्ट्रीय पुरस्कार थेट खिशात घातला.
'खिसा' या लघुपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणातील कौशल्याला दाद देणारा राष्ट्रीय पुरस्कार यंदा त्यांना जाहीर झाला आणि या टीमला आनंदाचे भरते आले. आपण केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना या रंगकर्मींमध्ये दाटून आली. रंगभूमीवर विविध प्रयोग करत आपला खास ठसा उमटवणारा युवा अभिनेता कैलाश वाघमारे याने, समाजाच्या जगण्यातले वास्तव आणि वास्तवातले जगणे मांडत या लघुपटाची कथा व पटकथा लिहिली आहे.
विशेष म्हणजे, एका सामाजिक प्रश्नावर या लघुपटातून भाष्य केले गेले आहे.
विदर्भातील अकोल्यात चित्रीकरण करण्यात आलेल्या या लघुपटात, देशाच्या सामाजिक वातावरणावर आणि खेडेगावातील आजही संकुचित असलेल्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या लघुपटात कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधुदीप, डॉ. शेषपाल गणवीर, वेदांत श्रीसागर आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
'खिसा' या लघुपटाने विविध चित्रपट महोत्सव पुरस्कार याआधीच आपल्या खिशात टाकले आहेत. ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या लघुपटाची निवड झाली होती, तसेच १० वा दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव, गोल्डन स्टार पुरस्कार, डब्लिन इंटरनॅशनल शॉर्ट ॲण्ड म्युझिक फेस्टिव्हल-२०२०, मुंबई इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हल, मॉन्ट्रियल इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल, २६ वा कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अशा विविध ठिकाणी 'खिसा'ने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.