मुंबई - राज्य शासनाच्या गॅझेटिअर म्हणजेच दर्शनिका विभागाने नुकतेच साठाव्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचाच भाग म्हणून दर्शनिका विभागाकडून नव्या वर्षात पहिल्यांदाच गॅझेटिअरविषयी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेत अन्य राज्यांतील गॅझेटिअरचे आदान प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती दर्शनिका विभागाने दिली आहे.
गॅझेटिअर म्हणजे प्राकृतिक भूस्वरूप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भोगोलिक माहिती, लोकांच्या चालीरीती राजघराण्याचा इतिहास, अर्थव्यवस्था, महसूल, प्रशासन आणि पुरावशेषांचा तपशील देणारा कोश ही मूळची संकल्पना आहे. त्याप्रमाणे, महाराष्ट्राला ब्रिटीश काळापासून गॅझेटिअरचा इतिहास आहे. त्यामुळे त्या कालावधीपासून गॅझेटिअरचे काम काळानुरुप कात स्वरुप बदलत आजमितीस सुरु आहे, अशी माहिती विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी दिली आहे.
नव्या वर्षांत होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेच्या निमित्ताने गॅझेटिअरची व्याप्ती वाढावी या उद्देशाने आयोजन करण्यात येणार आहे. गॅझेटिअरचा संदर्भग्रंथ म्हणून वापर होत आला आहे, त्यामुळे या परिषदेच्या निमित्ताने अन्य राज्यातील गॅझेटिअरचे स्वरुप, काळानुरुप सुरु असलेले डिजिटलयाझेशन, आॅडिओ बुक्स, ई बुक्स विषयी परिषदेत विचारमंथन होणार आहे. तसेच, गॅझेटिअर क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नव्या पिढीतील अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशभरातील गॅझेटिअरची परंपरा, त्यांचे स्वरुप सर्वसामान्यांना जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
इंटरनेटला सक्षम पर्याय व्हावा हा मानस - डॉ. दिलीप बलसेकर, कार्यकारी संपादक व सचिव , दर्शनिका विभागअनेकदा आपण कोणतीही माहिती हवी असल्यास पटकन इंटरनेटचा आधार घेतो. मात्र त्या माहितीतील सत्यता, अचूकता पडताळताना कमी पडतो. त्यामुळे चुकीचे संदर्भ, दाखल्यांचा अभाव, अपुरी माहिती अशा अनेक समस्या उद्भवतात. परिणामी, इंटरनेटच्या या एका क्लिकला पर्याय म्हणून गॅझेटिअरकडे सर्व सामन्यांनी वळावे. विशेषतः नव्या पिढीने गॅझेटिअर स्विकारावे हा मानस आहे.