मुंबई - भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध देशात चित्रपटांना प्रचंड महत्त्व आहे. चित्रपट निर्मितीची सुरुवात झाल्यापासून अनेक दिग्गज अभिनेते-निर्मात्यांनी चित्रपट क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत जुने चित्रपट जतन करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
भारताच्या अफाट चित्रपट वारशाचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. एनएफएचएम हा एक मोठा उपक्रम आहे, ज्यात चित्रपट संरक्षणाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. खराब होत चाललेल्या चित्रपटांचा ४के, ३५ एमएम या आधुनिक स्वरुपात पुनर्संचय करणे, चित्रपटाच्या प्रिंट्सचे डिजिटायझेशन, दस्तऐवजीकरण आणि प्रतिबंधात्मक संवर्धन यांचा समावेश आहे. एनएफडीसी-एनएफएआयच्या पुणे कॅम्पस येथे हे कार्य करण्यात येते. जागतिक चित्रपट दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने जतन करून नव्या स्वरुपात आणलेल्या चित्रपटांचे कौतुक चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी केले. 'रेश्मा और शेरा', 'गाईड', 'चौदहवी का चांद' यांसारख्या दर्जेदार चित्रपटात अभिनय करणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त वहिदा रेहमान या चित्रपटांचे कौतुक करताना म्हणाल्या की, मला सहसा माझेच चित्रपट पाहायला आवडत नाहीत. कारण त्यामध्ये अनेक त्रुटी दिसून येतात, पण 'गाईड' चित्रपट नव्या स्वरुपात पाहताना मी आश्चर्यचकीत झाले. तब्बल ६० वर्षांनंतरही हा चित्रपट खिळवून ठेवतो.
माझ्या मुलीसोबत हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणे ही माझ्यासाठी विशेष पर्वणी होती. हे चित्रपट नव्या रुपात आणून नव्या पीढीला त्याचा आनंद घेण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. दिग्दर्शक-निर्माते गोविंद निहलानी यांनीही या मोहिमेचे कौतुक केले. ते म्हणाले की, 'आघात' चित्रपट नव्या रुपात पाहणे खूपच समाधानकारक होते. आवाजाचा दर्जा, रंगसंगतीतील सुधारणा अतिशय दर्जेदार होत्या. एनएफडीसी-एनएफएआय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाने 'आघात' चित्रपट ३५एमएम नव्या स्वरुपात आणल्याचा मला आनंद आहे.
आगामी काळात विविध भाषांमधील इतर अनेक महत्त्वपूर्ण चित्रपट एनएफएचएम अंतर्गत पुनर्संचयित केले जाणार आहेत. यामध्ये भारतीय चित्रपटांच्या समृद्ध इतिहासाचा भाग असलेल्या अनेक भारतीय भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. याबद्दल एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार म्हणाले की, दर्जेदार क्लासिक चित्रपटांचा पुनर्संचय आणि डिजिटायझेशन करणे हा या उपक्रमातील महत्त्वाचा भाग आहे. सध्या अनेक जुन्या चित्रपटांच्या प्रिंट्स खराब झालेल्या अवस्थेत आहेत. वेळ, अयोग्यरित्या स्टोरेज आणि विविध पर्यावरणीय घटकांचा परिणाम यांच्यामुळे हे चित्रपट कायमचे नष्ट होण्याचा धोका आहे. एनएफएचएमअंतर्गत चित्रपटाच्या या प्रती अत्यंत काळजीपूर्वकरित्या पुनरुज्जीवित केल्या जातात, ज्यामुळे चित्रपटांची मूळ गुणवत्ता टिकून राहिल.