बोरिवलीतील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयावर राष्ट्रध्वज उलटा फडकविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:07 AM2021-07-29T04:07:50+5:302021-07-29T04:07:50+5:30
मुंबई : बोरिवलीतील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयाच्या इमारतीवर देशाचा राष्ट्रध्वज उलटा लटकवित त्याचा अपमान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जून महिन्यात ...
मुंबई : बोरिवलीतील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयाच्या इमारतीवर देशाचा राष्ट्रध्वज उलटा लटकवित त्याचा अपमान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जून महिन्यात उघडकीस आला होता. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणी अदानी समूहाने देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी याप्रकरणातील तक्रारदार तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बोरिवली विधानसभा विभाग अध्यक्षांनी केली आहे.
बोरिवली पश्चिमच्या देवीदास लेन याठिकाणी अदानी इलेक्ट्रिसिटीचे कार्यालय आहे. यातील तक्रारदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बोरिवली विधानसभा विभाग अध्यक्ष प्रसाद कुलापकर यांनी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, ३० जून, २०२१ रोजी त्यांच्या एका कार्यकर्त्याने राष्ट्रध्वज अयोग्य पद्धतीने म्हणजे भगवी बाजू खाली तर हिरवी बाजू वर असलेल्या स्थितीत झेंडा अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयावर फडकविण्यात आल्याचे पाहिले. तेव्हा त्यांनी लगेचच याचे व्हिडिओ शूट करत फोटो काढले. त्यानंतर याबाबत कुलपकर यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. उशिरा रात्री याप्रकरणी अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयाच्या सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जुलै महिन्यात सदर सुरक्षारक्षकाला अटकही करण्यात आली. मात्र याप्रकरणी समूह प्रमुखाने माफी मागण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
आरोपीला केली अटक
राष्ट्रध्वजाच्या अपमानप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल करत दोन दिवसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली. त्याला आता जामीन मंजूर झाला आहे.
-पोपट येळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे
माफी मागा अन्यथा आंदोलन करू!
राष्ट्रध्वजाचा अपमान हा भारत देशाचा अपमान आहे, जो आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे अदानीचा जो कोणी प्रमुख असेल त्याने याप्रकरणात देशाची जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही याविरोधात तीव्र आंदोलन करू.
-प्रसाद कुलापकर, अध्यक्ष, बोरिवली विधानसभा विभाग, मनसे
फोटो: अदानी इलेक्ट्रिसिटीच्या बोरिवली कार्यालयावर उलटा फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज.