Join us  

सावली केअर सेंटरचा राष्ट्रीय सन्मान

By admin | Published: April 22, 2017 1:11 AM

किशोर देशपांडे : मुंबईत सोमवारी ‘आनंदमयी’ पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर : मंगेशकर कुटुंबीयांतर्फे दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या नावाने दिला जाणारा यावर्षीचा ‘आनंदमयी’ राष्ट्रीय पुरस्कार सावली केअर सेंटर या सामाजिक संस्थेला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवारी (दि. २४) सायंकाळी सहा वाजता मुंबईतील षणमुखानंद सभागृहात होणार आहे, अशी माहिती ‘सावली’चे किशोर देशपांडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.देशपांडे म्हणाले, ‘सावली’च्या इमारत बांधकाम निधीच्या मदतीसाठी फिअरलेस फ्लायर्स फौंडेशनने जानेवारीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, कलांगण मुंबई आणि मिरज येथील नृत्यश्रीच्या नृत्यांगना धनश्री आपटे यांचा तेजोमय तेजोनिधी हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रचलित, अप्रचलित गीतांचा भरतनाट्यम नृत्यशैलीमधील कार्यक्रम झाला. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रमुख उपस्थित होते. त्यांनी ‘सावली’च्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी ‘आनंदमयी’ पुरस्कार संस्थेला जाहीर केला आहे. मास्टर दीनानाथजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. यावर्षी त्यांच्या ७५ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सोमवारी (दि. २४) मुंबईत होईल. यामध्ये ‘सावली’ संस्थेला हा पुरस्कार सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. १ लाख ११ हजार १०१ रुपये रोख व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पत्रकार परिषदेस उदय भेंडिगिरी, अमित हुक्केरी, अनुजा भिडे, महेश गोटखिंडीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)पिराचीवाडी येथे नवी इमारतवयोवृद्धांचे संगोपन, त्यांची सुश्रुषा करण्यासाठी ‘सावली केअर सेंटर’ सुरू करण्यात आले. यासह कोहम मेंटल अ‍ॅन्ड रिहॅबिलिटेशन सेंटरद्वारे दिव्यांग असणाऱ्या सहा महिन्यांच्या तान्हा बाळापासून वृद्धांपर्यंतचे संगोपन केले जाते. संस्थेत १०१ लोक असून, यातील २६ जणांचे संगोपन मोफत केले जाते. संस्थेची नवी इमारत पिराचीवाडी (ता. करवीर) येथे उभारण्यात येत आहे. या ठिकाणी वॉटर थेरपी टँकची देशातील पहिली सुविधा असणार आहे. याद्वारे कंबर, गुडघेदुखी, आदींवर उपचार केले जातील. त्यासह जिम्नॅस्टिक, आदी स्वरुपातील अद्ययावत सुविधा असतील. संस्थेच्या इमारत निधीसाठी समाजातील दानशूर लोक, संस्थांनी मदत करावी, असे आवाहन देशपांडे यांनी केले.