राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार समांतर तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:07 AM2021-02-27T04:07:09+5:302021-02-27T04:07:09+5:30
अंबानी कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी : मुंबई इंडियन लिहिलेल्या बॅगेत धमकीचे पत्र; गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...
अंबानी कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी : मुंबई इंडियन लिहिलेल्या बॅगेत धमकीचे पत्र; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील निवासस्थानाबाहेर उभ्या करण्यात आलेल्या गाडीत जिलेटिनच्या कांड्यांबरोबरच अंबानी कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्रही सापडले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय राष्ट्रीय तपास यंत्रणाही समांतर तपास करणार आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक शुक्रवारी मुंबईत आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच मुंबई पाेलिसांबराेबरही बैठक झाल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गावदेवी पोलिसांसह गुन्हे शाखा, राज्य दहशतवादविरोधी पथक तसेच केंद्रीय तपास यंत्रणा पुढील तपास करीत आहे. गावदेवी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात जीवे मारण्याची धमकी देणे तसेच स्फोटके बाळगणे या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
* नीता भाभी-मुकेश भय्या, ही तर एक झलक
मुकेश अंबानी यांना उद्देशून असलेल्या या पत्रात मुकेश भय्या-नीता भाभी, ही तर एक झलक असल्याचे म्हटले आहे. पुढच्या वेळी पूर्ण सामान घेऊन येईन. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उडवण्याची व्यवस्था केली गेली आहे, अशा आशयाचा मजकूर मोडक्यातोडक्या इंग्रजी भाषेत लिहिलेला आहे.
अंबानी यांना यापूर्वी २०१३ मध्येही धमकीचे पत्र आले होते. ते इंडियन मुजाहिद्दीनकडून आल्याची माहिती तेव्हा समोर आली होती. त्याचा एटीएसकडून तपास सुरू आहे. त्याच्याशी या पत्राचेही काही कनेक्शन आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.
* काय होते गाडीत?
गाडीमध्ये ‘मुंबई इंडियन’ असे लिहिलेल्या बॅगेत धमकीचे पत्र, २०-२५ जिलेटिनच्या कांड्या आणि ठाणे, मुंबई येथील नोंदणी असलेल्या चार बनावट नंबर प्लेट मिळाल्या.
* गाडी चोरीची
अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर उभी करून ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी ही चोरीला गेल्याची तक्रार १८ फेब्रुवारी २०२१ रोजी विक्रोळी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली आहे. स्टेअरिंग जाम झाल्यामुळे ऐरोली येथे उभी केलेली ही गाडी दुसऱ्या दिवशी चोरीला गेली होती.
* जिलेटिनच्या कांड्या नागपूरहून आल्या
जिलेटिनच्या कांड्या नागपूरहून सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीकडून मुंबईत आल्याचे निष्पन झाले आहे. त्यादृष्टीने पोलीस आता तपास करीत आहेत.
* हस्ताक्षर ओळखता येऊ नये म्हणून...
या पत्रातील मजकूर एखाद्या जाणकार व्यक्तीने मुद्दाम मोडक्या-तोडक्या भाषेत लिहिला असावा. आधी हाताने कागदावर लिहून पुढे हस्ताक्षर ओळखता येऊ नये म्हणून त्याची प्रिंट काढून या बॅगेत ठेवली असल्याचा अंदाज गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविला आहे.
* अंबानींनी मानले पोलिसांचे आभार...
पोलिसांनी तत्काळ दखल घेत कारवाई सुरू केल्यामुळे त्यांचे आभार. आम्हाला विश्वास आहे की, मुंबई पोलीस याचा सखोल तपास करून लवकरच याच्या मुळापर्यंत पोहोचतील.
- प्रवक्ता, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
* घटनाक्रम...
१७ फेब्रुवारी - १७ फेब्रुवारी रोजी तक्रारदार गाडी मालक हीरेन मनसुख यांनी मुलुंड - ऐरोली ब्रिजखाली स्कॉर्पियोत बिघाड झाला म्हणून पार्क केली.
१७ फेब्रुवारी मध्यरात्री : स्कॉर्पिओ चोरीला
१८ फेब्रुवारी : दुपारी एक वाजता वाहन चोरी झाल्याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
...........
बुधवार, २४ फेब्रुवारी
मध्यरात्री
१.२० - स्कॉर्पिओ आणि इनोव्हा कार ठाणे येथून मुंबईत आली.
१.४० - स्कॉर्पिओ कार पुढे येऊन प्रियदर्शनी चौक येथे थांबली. त्यानंतर इनोव्हा तेथे पोहचताच दोन्ही वाहने दादर, आंंबेडकर रोड मार्गे कारमायकेल रोड परिसरात पोहचले.
२.१८ - कारमायकेल रोड परिसरात स्कॉर्पिओ पार्क करून चालक इनोव्हा मध्ये बसून पसार
पहाटे
३. ५ - वाजता इनोव्हा आनंद नगर टोलनाका येथून ठाण्यात जाताना दिसते
........
गुरूवार, २५ फेब्रुवारी
दुपारी २ - अंबानी यांच्या सुरक्षा मॅनेजरकड़ून संशयास्पद कारबाबत पोलिसांना फोन
२.३० - पोलीस पथक घटनास्थळी दाखल
रात्री १२. ३० - गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद