राष्ट्रपुरुषांचे साहित्य आता संकेतस्थळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 05:33 AM2018-05-07T05:33:23+5:302018-05-07T05:33:23+5:30
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महाराजा सयाजीराव गायकवाड यांची चरित्रे आता लवकरच डिजिटल पद्धतीने संकेतस्थळावर येणार आहेत.
मुंबई - उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महाराजा सयाजीराव गायकवाड यांची चरित्रे आता लवकरच डिजिटल पद्धतीने संकेतस्थळावर येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेपर्यंत हे साहित्य पोहोचण्याचा मार्ग खुला होणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा स्वतंत्र प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत चरित्र साधने प्रकाशन समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी प्रकाशित केलेले साहित्य सर्व जगाला मार्गदर्शक ठरणार असल्यामुळे त्याचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. या प्रकल्पात स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येणार असून, त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे.
या प्रकल्पासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत काम सुरू झाले आहे. याकरिता, केपीएमजी अॅडव्हायझरी सर्व्हिसेस या कंपनीकडे हे काम सोपविले असून निविदा मंजुरीनंतरची प्रकल्प अमंलबजावणी विषयक कामे सुुरू आहेत.