Join us  

ग्रेस फाऊंडेशनतर्फे युवा शास्त्रीय गायकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन

By संजय घावरे | Published: July 30, 2024 12:11 AM

पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुणीजान बंदिश स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन (ग्रेस) फाऊंडेशनतर्फे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त देशपातळीवरील गुणीजान बंदिश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते ३० वयोगटातील गायकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धा पुरुष व महिला विभागात होणार असून, प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

ग्रेस फाऊंडेशनचे संस्थापक तसेच पंडित सी. आर. व्यास यांचे पुत्र शशी व्यास यांच्या पुढाकारातून आणि पंडित सी. आर. व्यास यांच्या ज्येष्ठ शिष्या अपर्णा केळकर यांच्या संकल्पनेतून भारतीय शास्त्रीय संगीतातील युवा होतकरू गायकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुरुष आणि स्त्री विभागात स्पर्धा स्वतंत्रपणे घेतली जाणार असून, विजेत्या स्पर्धकास (स्त्री आणि पुरुष) एक लाख २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे. त्याच प्रमाणे द्वितीय क्रमांकास (स्त्री आणि पुरुष) ७५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकास (स्त्री आणि पुरुष) ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी गायकांनी आपले व्हिडिओ संस्थेकडे पाठविणे आवश्यक असून या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांना प्रत्यक्ष स्वरमंचावर सादरीकरण करावे लागणार आहे. यानंतर स्पर्धेतून बाद ठरलेल्या गायकांना सहभागाबद्दल योग्य ते पारितोषिक दिले जाणार आहे. इच्छुक स्पर्धकांना गुणीजान बंदिश या संकेतस्थळावर स्पर्धेविषयी अधिक माहिती मिळू शकेल. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी नोंदणीही करता येईल. ३१ जुलै २०२४ हि नोंदणी करण्याची अखेरची तारीख आहे.

ग्रेस फाऊंडेशनचे संस्थापक शशी व्यास स्पर्धेविषयी म्हणाले की, माझे वडिल पंडित सी. आर. व्यास यांनी आपले आयुष्य हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी वाहून घेतले होते. त्यांच्या सांगीतिक आठवणींना उजाळा मिळावा म्हणून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा प्रतिभावान गायक कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी हा स्पर्धेच्या आयोजना मागील हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई