Join us

देशपातळीवर नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार कोरोनाविरोधातील लसीकरणाचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 9:27 PM

Corona vaccine : मुंबईत एकूण ९ केंद्रांवर ४० बूथवर लसीकरण होणार आहे. सुरवातीला दररोज सरासरी ४ हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

मुंबई - कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (शनिवार १६ जानेवारी) सकाळी ११.३० वाजता मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे. तत्पुर्वी, देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी १०.३० वाजता विलेपार्ले स्थित डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबईत एकूण ९ केंद्रांवर ४० बूथवर लसीकरण होणार आहे. सुरवातीला दररोज सरासरी ४ हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड १९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचे सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे १ लाख ३० हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी ७ हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.    

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात  येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आदी.  त्यानंतर तिसऱया टप्प्यात ५० वर्षावरील सर्व नागरिक तसेच ५० वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मुंबईत ६३ लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यांद्वारे दररोज सुमारे ५० हजार नागरिकांचे लसीकरण करता येणार आहे. 

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबई