६ आणि ७ फेब्रुवारीला दिल्लीत असाक्षरांचा राष्ट्रीय मेळावा; रत्नागिरीच्या अनन्याला विशेष निमंत्रण
By रेश्मा शिवडेकर | Published: February 3, 2024 01:50 PM2024-02-03T13:50:00+5:302024-02-03T13:50:15+5:30
मस्कर अन् क्षीरसागर आजींची प्रेरणादायी छायाचित्रे साक्षरतेच्या प्रचारात!
मुंबई- उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत ६ व ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत असाक्षर व नवसाक्षरांचा राष्ट्रीय मेळावा होणार आहे. महाराष्ट्रातून ४ अधिकाऱ्यांसह वीस जणांचे पथक या 'उल्लास मेला' मध्ये सहभागी होणार आहे. केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्रालयाने याचे आयोजन केले आहे.
राष्ट्रीय पातळीवर शिक्षण प्रेरणा देणा-या कलाकृतीची दखल घेतलेल्या रत्नागिरीच्या अनन्या चव्हाण व तिच्या पालकांना केंद्र शासनाने विशेष निमंत्रण दिले आहे. तिने साकारलेल्या कलाकृतीसह राज्यात साक्षरता प्रचारात प्रेरणादायी ठरत असलेले सातारा येथील ७६ वर्षीय बबई मस्कर यांचे साक्षरता वर्गातील पहिल्या दिवसाचे छायाचित्र आणि मणक्याच्या आजाराने त्रस्त असून शिक्षण घेण्याची उर्मी असलेल्या बारामती येथील ७६ वर्षीय सुशीला क्षीरसागर व रुचिता क्षीरसागर यांची कॅनव्हासवर चित्रीत केलेली छायाचित्रे केंद्रीय शिक्षण मंत्रालयास राज्याकडून भेट देण्यात येणार आहेत. या तीनही उपक्रमांची केंद्र शासनाने यापूर्वीच दखल घेतली आहे.
२०२२ ते २७ या पंचवार्षिक कालावधीत दरवर्षी एक कोटी प्रमाणे पाच कोटी लोकांना साक्षर करण्याचे या योजनेअंतर्गत उद्दिष्ट आहे. देशभरातील ३० घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रातिनिधिक असाक्षर आणि नवसाक्षर स्वयंसेवी शिक्षकांसह नवी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवनात होणाऱ्या या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून पुणे,अमरावती, गडचिरोली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातून या मेळाव्यात चार अधिकारी, दोन असाक्षर, दोन स्वयंसेवक, दहा कलाकार आणि दोन विशेष निमंत्रित अशा वीस जणांचे पथक सहभागी होत आहे. योजना शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर सहाय्यक योजना अधिकारी विराज खराटे, राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील साक्षरता केंद्राच्या प्रमुख गीतांजली बोरुडे, अधिव्याख्याता पंढरीनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे पथक सांस्कृतिक कार्यक्रम, योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्यक्रमांचे सादरीकरण करणार आहे.
अभियानांतर्गत अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन यासाठी विकसित केलेल्या उल्लास व उजास मार्गदर्शिका,कृतिपत्रिका यांचे प्रकाशन होणार आहे. नवसाक्षर आणि असाक्षरांचे अनुभव प्रकटीकरण, स्वयंसेवकांचे चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र स्टॉल उभारण्यात येणार असून त्याद्वारे या अभियानांतर्गत झालेल्या व सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती तसेच अध्ययन अध्यापनासाठी विकसित केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन स्टॉलद्वारे करता येणार आहे. कोल्हापूर डाएटचे अधिव्याख्याता तुकाराम कुंभार यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांचे कलापथक साक्षरतेवर हिंदी पोवाडा सादर करणार आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात आजवर ३ लाख ३५ हजार असाक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली असून या योजनेस गती मिळत आहे.
"असाक्षरता नोंदणीत राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी करणाऱ्या अमरावती व गडचिरोली जिल्ह्यातील व्यक्तींना मेळाव्यात सहभागी होण्याची प्रातिनिधिक संधी देण्यात आली आहे."
-डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)