मुंबईत उभे राहणार 'विंदां'चे राष्ट्रीय स्मारक, साहित्यप्रेमींसाठी पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:19 AM2018-01-25T03:19:30+5:302018-01-25T09:46:56+5:30
मराठीतील श्रेष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विंदा करंदीकरांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईत उभे राहणार आहे. चेतना महाविद्यालय आणि विंदा करंदीकर स्मारक समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे कार्य सुरू झालेले आहे.
सागर नेवरेकर
मुंबई : मराठीतील श्रेष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विंदा करंदीकरांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईत उभे राहणार आहे. चेतना महाविद्यालय आणि विंदा करंदीकर स्मारक समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे कार्य सुरू झालेले आहे. वांद्रे पूर्वेकडील चेतना महाविद्यालयात हे स्मारक उभारण्यात येत आहे. यंदा विंदांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षाची सांगता २३ आॅगस्ट २०१८ रोजी होत आहे. राष्ट्रीय स्मारकाची उभारणी आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार विंदा करंदीकर स्मारक समिती आणि चेतना महाविद्यालय यांनी केला आहे.
चेतना महाविद्यालयाच्या ‘मनसुखलाल छगनलाल ग्रंथालया’त विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारकासाठी तात्पुरते स्वतंत्र दालन तयार केले आहे.
या राष्ट्रीय स्मारकात विंदांना मिळालेली सन्मानचिन्हे, पारितोषिके, मानपत्रे जतन करून ठेवण्यात येतील. तसेच दुर्मीळ छायाचित्रेही येथे संरक्षित केली जातील. विंदांचा जीवनपट नव्या पिढीसमोर याद्वारे मांडण्याचा संकल्प आहे. करंदीकरांची हस्तलिखिते, त्यांच्या वापरातील लेखन साहित्य व संबंधित वस्तू, प्रकाशित साहित्यही या राष्ट्रीय स्मारकात ठेवले जाईल. अभ्यासकांसाठी विंदांच्या साहित्याची समीक्षा करणारी पुस्तके, लेख, मुलाखतीही या स्मारकात उपलब्ध असतील. विंदांविषयीचे दृकश्राव्य माध्यमातील साहित्यदेखील असेल. या स्मारकाच्या माध्यमातून साहित्य व संस्कृती याविषयीची व्याख्यानमाला, चर्चासत्रे आयोजित करण्यात येतील. दरवर्षी ज्ञानपीठ विजेत्या राष्ट्रीय पातळीवरील लेखकांचे व्याख्यान येथे आयोजित केले जाणार आहे. तरुण पिढीमध्ये मराठी साहित्याची रुची निर्माण व्हावी, यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारकाचा मानस आहे.
साहित्यप्रेमींना आवाहन-
राज्यात ज्या व्यक्तींकडे विंदांची छायाचित्रे, पत्रे, हस्तलिखिते, मुलाखती व व्याख्यानांच्या, कविता वाचनाच्या दृक्श्राव्य प्रती असतील तर त्या स्मारकाकडे दिल्यास त्यांचे योग्य रीतीने जतन केले जाईल, असे आवाहन विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारकातर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात संबंधितांनी neegrind@gmail.com या संकेतस्थळावर संपर्क करावा. विजया राजाध्यक्ष, रामदास भटकळ, सुषमा पौडवाल हे विंदा करंदीकर स्मारक समितीचे सदस्य आहेत.
चेतना महाविद्यालयातील ग्रंथालयात अनेक साहित्यिकांचा राबता राहिला आहे. चेतना महाविद्यालयाचे ग्रंथालय हे साहित्य चर्चेचे केंद्र राहिले आहे. त्यामुळेच येथे विंदांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे या भावनेतून महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे.
- उदय करंदीकर,
विंदा करंदीकर यांचे पुत्र
विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारकाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. देशभरातील साहित्यिकांशी स्मारकाच्या माध्यमातून संवाद साधून विद्यार्थ्यांपर्यंत मराठी साहित्य पोहोचवण्यात येईल.
- डॉ. महेशचंद्र जोशी,
प्राचार्य, चेतना महाविद्यालय