राष्ट्रीय अवयवदान दिन यावर्षी रद्द, पुढच्या वर्षापासून तारीखही बदलली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 10:20 AM2022-11-27T10:20:55+5:302022-11-27T10:23:28+5:30
आजऐवजी पुढच्या वर्षापासून ३ ऑगस्टला होणार साजरा
संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षांत अवयवदान चळवळीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन अवयदान करण्यास चांगली सुरुवात झाली आहे. अवयवदान मोहिमेत ज्या राज्यांनी चांगले काम केले त्यांचा, रुग्णालयातील उत्कृष्ट समन्वयक, समाजसेवी संस्था यांचा देश पातळीवर दरवर्षी २७ नोव्हेंबर या राष्ट्रीय अवयव दान दिनी दिल्लीत सत्कार केला जातो. मात्र केंद्रीय आरोग्य विभागाने हा दिवस रद्द करून त्याऐवजी आता दि. ३ ऑगस्टला राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करणार असल्याचे सांगितले आहे.
मात्र यावर्षीचा हा दिवस साजरा करून नंतर तो पुढच्या वर्षापासून नव्या दिवशी साजरा केला जाऊ शकत असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. २०१०मध्ये राष्ट्रीय अवयदान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. आपल्या देशात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा ८ जुलै ११९४ साली अस्तित्वात आला. त्यामधील तरतुदीनुसार आपल्याकडे अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते.
काही दिवसांपूर्वीच दि. २७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय अवयवदान दिन रद्द केला असून, तो यापुढे ३ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार असल्याचे पत्रक काढण्यात आले असून, यावर नोटोचे प्रभारी संचालक डॉ. कृष्ण कुमार यांची स्वाक्षरी आहे. मात्र यावर्षीचा दिवस का रद्द करण्यात आला, याबाबत कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. यावर मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे सरचिटणीस डॉ. भरत शहा म्हणाले, पुढच्या वर्षी जो काय दिवस ठरवला आहे, त्यावेळी तो साजरा करावा. मात्र यावर्षी हा दिवस का साजरा करण्यात आला नाही, हे मला अजूनही कळलेले नाही. अवयवदान मोहिमेला बळ मिळणे गरजेचे आहे. राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्थेच्या संचालिका डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले की, आम्हाला काही दिवसांपूर्वीच कळाले की राष्ट्रीय अवयवदान दिन ३ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे.
३ ऑगस्टला राष्ट्रीय अवयवदान दिन का?
n नोटोने काढलेल्या पत्रकात अवयव प्रत्यारोपणाचा कायदा आल्यानंतर ३ ऑगस्ट १९९४ रोजी देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
n त्या दिवसाची आठवण म्हणून यापुढे ३ ऑगस्टला राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.
n तसेच हा कायदा जुलै महिन्यात संमत करण्यात आला होता. त्यामुळे जुलै महिना यापुढे अवयवदान महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे.