मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४० टक्के हिरवळ मागील २० वर्षांत कमी झाल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नाही तर आरेसह मुंबईतील पाणथळ जागांवरील जंगल वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणांबरोबरच मुंबईकरांनीही पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर पर्यावरणवाद्यांनी लगावला आहे. ‘जागतिक वन दिना’चे औचित्य साधत ‘लोकमत’ने वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन आणि वॉचडॉग फाउंडेशनचे ट्रस्टी गॉडफ्रे पिमेंटा यांच्याशी संवाद साधला असून, त्यांनी मुंबईतील वृक्षसंपदेसाठी मुंबईकरांनीही काम केले पाहिजे, असे मत मांडले आहे.वॉचडॉग फाउंडेशनचे ट्रस्टी गॉडफ्रे पिमेंटा यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले की, मुंबईतल्या वृक्षांची काळजी घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. यंत्रणा सरकारी असो वा खासगी असो; आपणच झाडे जतन केली पाहिजेत. विकास करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपण जेव्हा एखाद्या प्रकल्पासाठी झाडे तोडतो तेव्हा ती दहापटीने लावली पाहिजेत. कारण जर दहा झाडे लावली तर त्यातील किमान पाच झाडे तरी जगतील. दुसरीकडे मुंबईमधील काँक्रीटीकरणामुळे येथील झाडे तग धरून राहत नाहीत. या कारणात्सव सर्वसमावेशक विचार केला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मेट्रो-३ प्रकल्पाचा विचार करताना प्राधिकरण मोफत झाडे वाटणार आहे. परंतु झाडे मोफत जरी वाटली तरी लावणार कुठे, हा प्रश्न आहेच की. सरकारी जागांवर वनीकरण वाढणे महत्त्वाचे असून, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४० टक्के हिरवळ मागील २० वर्षांत कमी झाली आहे; आणि या वृत्ताला सॅटेलाईट इमेजचा आधार आहे. परिणामी, किमान आता तरी पर्यावरणाचा प्राधान्याने विचार करण्याची गरज आहे.वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले की, मुंबईमधील वनसंपदा कमी होत आहे, असे आपण म्हणतो. मात्र यास सरकारी यंत्रणेबरोबर मुंबईकरदेखील कारणीभूत आहेत. कारण आपण झाडांवर आपला हक्क दाखवत नाही. खासगी विकासकांना संधी मिळाली की झाडांच्या जागी अतिक्रमण होते. वृक्ष संपदेची हानी होण्यामागे सरकारी आणि मुंबईकरांची अनास्था कारणीभूत आहे. मुंबईमध्ये दोन प्रकाराची वनसंपदा आहे. पहिली म्हणजे बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह आरे कॉलनीमधील जंगल; आणि दुसरे म्हणजे पाणथळ जंगल. मात्र आपण सातत्याने याकडे दुर्लक्ष करीत आलो आहोत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विचार करता येथील दोन हजार हेक्टर जागेवर अतिक्रमण झाले आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. (प्रतिनिधी)
नॅशनल पार्कमधील हिरवळ कमी झाली
By admin | Published: March 21, 2017 2:41 AM