गँगस्टर रवी पुजारीच्या तपासासाठी राष्ट्रीय स्तरावर एसआयटी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:40 AM2020-02-25T03:40:15+5:302020-02-25T06:53:29+5:30
केंद्रीय गृह विभागाचा विचार; बहुराज्यात गुन्हे दाखल असल्याने समन्वयाने तपास
- जमीर काझी
मुंबई : गेल्या दीड दशकाहून अधिक काळ गुंगारा देणाऱ्या गॅँगस्टर रवी पुजारीला अटक करण्यात भारतीय तपास यंत्रणेला यश आले आहे. मात्र, त्याच्यावर विविध राज्यांत गुुन्हे दाखल असल्याने त्याचा सविस्तर तपास करणे आव्हानात्मक आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा विचार केंद्रीय गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.
एसआयटीमध्ये मुंबईसह मंगळुरू, अहमदाबाद येथील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचा समावेश असेल. बिल्डर, व्यावसायिक, व्यापारी, सेलिब्रिटींचा खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणीसारख्या कृत्यामध्ये सराईत पुजारीच्या गुन्ह्याची व्याप्ती महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरातमध्येही आहे. त्यामुळे तो तिन्ही राज्यांच्या पोलिसांच्या ‘हिटलिस्ट’वर असून तिघांनाही त्याचा ताबा हवा आहे.
दरम्यान, पुजारीला सोमवारी पहाटे भारतात आणले असून त्याला कर्नाटकातील मंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या रिमांडची पूर्तता झाल्यानंतर तीन राज्यांतील अधिकाºयांच्या समन्वय समितीतून एसआयटी स्थापन करण्यात येईल, अथवा केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेकडे (सीबीआय) तपास सोपविण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत सेनेगल येथे अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर असलेला पुजारी फरार होता. त्याच्या शोधासाठी केंद्रीय तपास यंत्रणेबरोबरच इंटरपोलही प्रयत्नशील होते. मंगळुरू पोलिसांनी त्याचा दक्षिण आफ्रिकेतील ठावठिकाणा शोधून काढला आणि ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने शुक्रवारी त्याला अटक केली. अॅन्थोनी फर्नांडिस या नावाने हॉटेल व्यावसायिक बनून बनावट पासपोर्टद्वारे तो दक्षिण आफ्रिका, बॅँकॉक, दुबईत वास्तव्य करीत होता. दरम्यान, त्याच्यावर महाराष्ट्रात दाखल असलेल्या गुन्ह्यांची सविस्तर माहिती नव्याने संकलित करण्यात आली असून ती केंद्रीय गृह विभाग, मंगळुरू पोलिसांकडे पाठविणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
ताबा मिळविण्यासाठी लागणार किमान सहा महिने
१९९०च्या दशकात पुजारीने मुंबईत धुमाकूळ घातला होता. ५६ वर्षांच्या पुजारीवर मुंबईसह महाराष्टÑात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीचे जवळपास ५६ गुन्हे दाखल आहेत. त्यातील २६ ‘मोक्का’अन्वये दाखल आहेत. त्यामुळे त्याचा ताबा मिळविण्यासाठी मुंबईचे पोलीस अधिकारीही प्रयत्नशील आहेत.
याशिवाय त्याचे जन्मठिकाण असलेल्या कर्नाटकातील मंगळुरू, बंगळुरू, म्हैसूर, हुबळी आदी ठिकाणी ९५ हून अधिक तर गुजरातमध्ये अहमदाबाद, सुरत येथे ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
प्रत्येक राज्याकडून त्याच्यावरील गुन्ह्याचा स्वतंत्र तपास करायचे ठरल्यास मुंबई पोलिसांना त्याचा ताबा मिळण्यासाठी किमान ६ महिने लागण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तविली.