देशातील पहिली व्हेनम बँक महाराष्ट्रात, सर्पदंश मृत्यू अर्ध्यावर आणण्याचा मोदींचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:03 PM2022-09-20T12:03:58+5:302022-09-20T12:04:09+5:30
सर्पदंश मृत्यू २०३० पर्यंत निम्म्यावर आणण्याचा सरकारचा निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतातली पहिली सर्पविष पेढी (व्हेनम बँक) आणि परीक्षण केंद्र राज्यात उभे राहणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिली. मंत्रालयात जागतिक सर्पदंश जागृती दिनानिमित्त झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निशिगंधा नाईक उपस्थित होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्पदंश मृत्यू २०३० पर्यंत अर्ध्यावर आणण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने वैज्ञानिक पूर्वतयारीचा भाग म्हणून विविध ५२ विषारी सर्पांच्या विषाचा अभ्यास करण्याकरिता पायाभूत संरचना उभी करावी लागेल. त्याचाच एक भाग म्हणून सर्पविष पेढी तसेच परीक्षण केंद्र उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक सर्पदंश आणि मृत्यू भारतात होतात. भारतातील सर्वाधिक सर्पदंश मृत्यू महाराष्ट्रात होतात, अशी आकडेवारी संशोधनानंतर स्पष्ट झाली आहे. त्याचप्रमाणे सापाच्या विविध जातींच्या विषात फरक असतो. त्याप्रमाणे त्यांची प्रतिविषे वेगळी असतात; परंतु तशा वेगळ्या लसी उपलब्ध नाहीत. कारण केवळ नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे याच चार जातींच्या सर्पांच्या विषांचा अभ्यास आजवर झाला आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
सापांच्या २६० प्रजाती
भारतात सापांच्या २६० प्रजाती असून त्यातील ५२ विषारी आहेत. या उर्वरित सापांच्या विषाचा आत्तापर्यंत पुरेसा अभ्यासच झालेला नाही. या सर्व जातींच्या सापांच्या विषावर एकच प्रभावी प्रतिविष निर्माण करण्याच्या दृष्टीनेही संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच राष्ट्रीय सर्पविष संशोधन केंद्र, सर्पविष पेढी आणि परीक्षण केंद्र स्थापन होणे आवश्यक आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.