एनआरसी, सीआयआयविरोधात आज राष्ट्रीय छात्र परिषद, जावेद अख्तरांसह दिग्गजांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:08 AM2020-01-05T05:08:07+5:302020-01-05T05:08:31+5:30
केंद्र सरकारने लागू केलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीआयआय), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) विरोधात रविवार ५ जानेवारीला राष्ट्रीय स्तरावर छात्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीआयआय), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) विरोधात रविवार ५ जानेवारीला राष्ट्रीय स्तरावर छात्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणाऱ्या या परिषदेला जेएनयूचे विद्यार्थी नेते उमर खालिद, उत्तर प्रदेशातील रिचा सिंग, अलिगढचे सलमान इम्तियाज, प्रदीप नरवाल यांच्यासह शिवसेनेचे युवानेते व मंत्री आदित्य ठाकरे, ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर आदींसह विविध पक्षांतील नेते सहभागी होणार आहेत.
परिषद दुपारी एक वाजता सुरू होणार असल्याची माहिती संघटक लोकेश लाटे, सचिन बनसोडे, दीपाली आंबे आदींनी दिली. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशभरात असंतोषाचे वातावरण आहे. या कायद्याच्या माध्यमातून देशातील आदिवासी, मुस्लीम आणि भटक्या जमातींना देशातून हाकलून लावण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे, तो जनतेकडून हाणून पाडला जाईल, त्यामध्ये भाजपविरोधी सर्व राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटनांना एकत्रित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत सर्व समविचारी विद्यार्थी संघटनांची परिषद घेण्यात येत आहे. त्यामध्ये जेएनयूचे विद्यार्थी नेता रामा नागा, जामियाचे विद्यार्थी नेता हम्मादुररहमान, मुंबईच्या विद्यार्थी नेत्या सादिया शेख, टीस विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष भट्टा राम, छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष प्रा. रवींद्र मेढे, मंत्री वर्षा गायकवाड, आमदार कपिल पाटील, आमदार रोहित पवार आदी सहभागी होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. परिषदेचे स्वागताध्यक्ष फारुक शेख असणार आहेत.