Join us

'महाराष्ट्राला वेड्यात काढलं जातंय'; अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून जितेंद्र आव्हाड संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 11:01 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून टीका केली आहे.

मुंबई- बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणजेच अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे शूटींग सुरू केले आहे. अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात'(Vedat Marathe Veer Daudle Saat) या चित्रपटात अक्षय कुमारछत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील कलाकारांच्या नावांची घोषणा झाली होती.

अक्षय कुमारने मंगळवारी एक शॉर्ट व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात तो शिवरायांच्या भूमिकेत दिसत आहे. 

अक्षय कुमारच्या या व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज ट्विट करत त्यांनी निशाणा साधला आहे. जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय... ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला "वेड्यात" काढलं जातयं असं वाटत असल्याची टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या घोषणेवेळी अक्षय कुमारने हा सिनेमा स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं होतं. ‘मला ही भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी, असं मला राज ठाकरे म्हणाले. छत्रपती महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सगळी शक्ती मी यासाठी खर्च करेन,’असं अक्षय कुमार म्हणाला होता.

'वेडात मराठी वीर दौडले सात' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि तुज्यात जीव रंगला अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारजितेंद्र आव्हाडमहेश मांजरेकर छत्रपती शिवाजी महाराज