"हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग?", जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं सततच्या अपघातांचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 12:49 PM2023-07-01T12:49:24+5:302023-07-01T12:49:49+5:30
samruddhi highway accident news : शनिवारची सकाळ उजाडताच महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी सर्वांच्या कानावर पडली.
मुंबई : शनिवारची सकाळ उजाडताच महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी सर्वांच्या कानावर पडली. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे कळते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. यानंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. मृत प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात ही चिंतेची बाब असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच 'हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
मागील काही कालावधीपासून समृद्धी महामार्गावर होत असलेले अपघात चिंतेत टाकणारे आहेत. या अपघातातील मृतांना विविध क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली असून सरकारद्वारे आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. "हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग? हा समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून पासून आतापर्यंत अनेक अपघात झालेत. गेली वर्षभरात त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा आणूनही अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे सामोरं आलेले आहे. यापुढे असे अपघात होऊ नये यासाठी सरकारने वेळीच उपाय-योजना करून योग्य ती पावले उचलावी", असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले.
हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग..?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 1, 2023
हा समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून पासून आतापर्यंत अनेक अपघात झालेत. गेली वर्षभरात त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.
समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा आणूनही अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. समृद्धी महामार्गाच्या…
कसा झाला अपघात?
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.
दरम्यान, या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दुसरीकडे, या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाखांची मदत दिली जाणार आहे आणि जखमींना ५० हजारांची मदत केली गेली आहे.