Join us

२५ वर्षांआधी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, त्यानंतर काय झालं?; शरद पवारांनी सांगितली आठवण!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 9:09 AM

महाराष्ट्राचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

आपण संघटनेमध्ये  सहभागी झालेलो आहोत. हा पक्ष सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. या पक्षावर आघातही खूप होतात, पण त्या आघाताची फिकीर ही तुम्ही आणि आपण करणे सोडून देऊया. आपण एकसंघ राहू. जे काही पक्षाचे कार्यक्रम असतील ते करू. तुमच्या  हिताची जी जी धोरणे तयार करायची असतील, त्यामध्ये लक्ष देऊ आणि एकजुटीने आपण या महाराष्ट्राचे चित्र आणखीन चांगले कसे होईल याची खबरदारी घेऊ आणि ते  करण्यामध्ये स्त्री शक्ती ही अत्यंत मोलाची शक्ती आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख (शरद पवार गट) शरद पवार यांनी सांगितले.

आपल्या गावात, आपल्या आजूबाजूच्या घरात हा राष्ट्रवादीचा विचार पोहोचवण्यासाठी जे काही करता येईल ते तुम्ही करा. त्याचा लाभ तुमच्या कुटुंबाला तर होईल, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला होईल. तो महाराष्ट्राचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. षण्मुखानंद सभागृह, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला विभागाचा ‘ज्योत निष्ठेची, सावित्रीच्या लेकींची’ हा सोहळा संपन्न झाला. यावेळी शरद पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. 

पक्षाची उभारणी मजबुतीने करण्याची आवश्यकता आहे, या भावनेने तुम्ही सर्व महिला भगिनी या ठिकाणी आलात. मला आठवतंय की, २५ वर्षांपूर्वी या सभागृहामध्ये राष्ट्रवादीच्या निर्मिती करण्यासाठी ठराव आम्ही केला. या ठिकाणी आम्ही पक्ष स्थापन केला. संध्याकाळी छत्रपती शिवाजी पार्कवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून १ लाखांहून अधिक कार्यकर्ते आले होते. त्या सर्वांनी या पक्षाची धुरा खांद्यावर घेण्याची  शपथ घेतली आणि पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने पावले टाकली, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

आपला पक्ष हा असा पक्ष आहे की, ज्याची स्थापना झाल्यानंतर ३ महिन्यांच्या आत  महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेवर जाण्याची जबाबदारी आपल्यावर सोपावली. अनेक लोक एकत्रित आले. ज्यांनी कधी विचार केला नव्हता, सामान्य कुटुंबातल्या  तरुणांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ५ ते १० वर्षांमध्ये  महाराष्ट्राला हे दाखवून दिले की, सामान्य माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक हा  राष्ट्रवादीचा कार्यकर्ता करतो आणि त्याचे कारण, तुम्हा सर्वांचे  सामुदायिक कष्ट घेण्याची जी भूमिका आहे त्यामुळे हे सर्व शक्य झाले, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. 

मी देशाचा संरक्षण मंत्री होतो अन्...

मी देशाचा संरक्षण मंत्री होतो आणि  संरक्षण मंत्री असताना २६ जानेवारीची परेड होती, त्या परेड नंतर जगामध्ये  मी पाहिले की, अनेक देशांमध्ये लष्करामध्ये महिला महत्त्वाचे काम करतात.  आपल्या देशात ही पद्धत नव्हती. आपल्या देशाचे लष्कर प्रमुख, हवाई जहाज  प्रमुख, नौसेनांचे प्रमुख या तिघांनाही मी बोलावले आणि त्यांना सांगितलं  की, आपल्या लष्करामध्ये मुलींना का घेतलं नाही ? त्या तिघांनी मला सांगितलं  की, अजिबात घेणे शक्य नाही. योग्य नाही. या देशाची रक्षण करण्याची ताकद  त्यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे हे शक्य नाही. एक बैठक झाली, दुसरी बैठक  झाली, तिसरी बैठक झाली, तिन्ही बैठकांमध्ये तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी  दरवेळी हेच उत्तर मला दिले. चौथ्या बैठकीमध्ये मी सांगितलं की, ‘या  देशातल्या जनतेने संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे, निर्णय  घ्यायचा अधिकार मला आहे’ आणि माझा हा निर्णय आहे की, ‘पुढच्या महिन्यापासून  या देशाच्या लष्करामध्ये सुरुवातीला ११% मुलींना जागा देण्यात येईल आणि हा  निर्णय घेतला’ आणि आज आपण बघतो आहोत की, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या दिवशी आपल्या देशातील मुली परेड करतात. सीमेवरच्या अतिशय महत्त्वाच्या भागांचे  रक्षण मुली करतात. अनेक ठिकाणी वैमानिक म्हणून अतिशय महत्त्वाची जबाबदारी मुली पार पाडतात.

एक आणखीन गोष्ट गंमत म्हणून सांगतो, एक दिवशी मी  मुंबईवरून दिल्लीला गेलो होतो आणि माझ्या शेजारी जे गृहस्थ होते त्यांनी  त्यांची ओळख करून दिली की, मी असा-असा आहे आणि लष्करामध्ये माझी नियुक्ती  झालेली आहे. त्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांनी एक गोष्ट मला  सांगितली की, तुमचा एक निर्णय आम्हाला पटला नाही. तुम्ही मुलींना यामध्ये  घेतलं हे काही बरं केलं नाही. मी विचारलं काय चुकलं माझं, त्यावर ते  बोललेत, ‘मुलं जेवढ्या बारकाईने काम करतात, तेवढ्या मुली करत नाही.  त्याच्यावर मला शंका आहे.’ मी त्यांना २-३ गोष्टी सांगितल्या की, तुमच्या  घरामध्ये घर चालवण्याची जबाबदारी, स्वयंपाक करण्याची जबाबदारी, भाजी  कापण्याची जबाबदारी महिला करतात. मी त्यांना विचारलं महिलाच का ? त्यावर  त्यांनी उत्तर दिले की, ‘महिलांचा एक स्वभाव आहे की, कोणतेही काम  त्यांच्यावर सोपवले तर ते अत्यंत बारकाईने त्या करतात.’ त्याउलट मुले  त्यांच्यावर असलेली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडायला जेवढं लक्ष देतात  त्यापेक्षा कितीतरी अधिक लक्ष मुली या देत असतात, अशी आठवणही शरद पवारांनी यावेळी सांगितली. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र